केरळचा अभिमान; संजू सॅमसनचा सन्मान

केरळचा अभिमान; संजू सॅमसनचा सन्मान

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याचा केरळ सरकारकडून विशेष सन्मान केला जाणार आहे. हा सन्मान सोहळा १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केरळ सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने दिली आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (Player of the Tournament) ठरलेल्या संजू सॅमसनचा राज्य सरकारतर्फे गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पिनराई विजयन उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची अध्यक्षता क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहीमान करतील. याशिवाय राज्यातील इतर मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

क्रीडा मंत्रालयाने संजू सॅमसनच्या स्वागतासाठी विशेष आणि भव्य व्यवस्था केली आहे. यापूर्वी विश्वचषकानंतर प्रथमच तिरुवनंतपुरममध्ये पोहोचल्यावर एअरपोर्टवरही त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. 🎉

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये संजू सॅमसनने आपल्या दमदार खेळामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेच्या सुरुवातीच्या अनेक सामन्यांत त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. त्या सामन्यात त्याने १५ चेंडूत २४ धावा करत आपला आत्मविश्वास दाखवला.

यानंतरच्या सामन्यांमध्ये सॅमसनने जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांत त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. सॅमसनने स्पर्धेत फक्त ५ सामने खेळून जवळपास २०० च्या स्ट्राइक रेटने ३२१ धावा केल्या. या शानदार कामगिरीमुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा (Player of the Tournament) किताब मिळाला.

संजू सॅमसनच्या या धडाकेबाज खेळींनी जगभरातील भारतीय क्रिकेट चाहत्यांना रोमांचित केले आहे

Exit mobile version