धोनीचा विक्रम धोक्यात?

धोनीचा विक्रम धोक्यात?

टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये शानदार कामगिरी करत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा संजू सॅमसन आता आयपीएल २०२६ मध्ये आणखी एक मोठा विक्रम गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये नाबाद ९७, इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये ८९ आणि न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये ८९ धावा करत सॅमसनने जबरदस्त छाप सोडली होती. त्याच फॉर्मला कायम ठेवत तो आयपीएलमध्ये इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे.

IPL इतिहासात विकेटकीपर फलंदाज म्हणून ५०००+ धावा करणारा एकमेव खेळाडू म्हणजे एमएस धोनी. धोनीने २००८ ते २०२५ दरम्यान २७८ सामन्यांत ५,४३९ धावा केल्या आहेत.

आता संजू सॅमसन या खास क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. २०१३ ते २०२५ दरम्यान १७७ सामन्यांत त्याने ४,७०४ धावा केल्या असून, फक्त २९६ धावा करताच तो ५००० धावांचा टप्पा पार करेल. असे झाले तर धोनीनंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा विकेटकीपर फलंदाज ठरेल.

या हंगामाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे संजू यंदा सीएसकेच्या पिवळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. २०१८ पासून राजस्थान रॉयल्ससाठी खेळणाऱ्या सॅमसनने २०२५ नंतर संघ सोडला आणि सीएसकेने त्याला ट्रेड करून आपल्या ताफ्यात सामील केले.

धोनीच्या संघातच खेळताना त्याच्या विक्रमाला गाठण्याची संधी मिळणे, हे सॅमसनसाठी अधिक खास ठरणार आहे.

Exit mobile version