वादाच्या भोवऱ्यात एमबाप्पे; माफी मागा, नाहीतर कोर्टात या!

वादाच्या भोवऱ्यात एमबाप्पे; माफी मागा, नाहीतर कोर्टात या!

फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे पुन्हा एकदा मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील वादामुळे चर्चेत आला आहे. पॅराग्वेच्या सिनेटर सेलेस्टे अमारिला यांनी एमबाप्पेंना सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली असून, तसे न केल्यास ‘लिंगभेदावर आधारित हिंसाचार’ प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ १६) फेरीत फ्रान्सकडून पॅराग्वेचा पराभव झाल्यानंतर अमारिला यांनी सोशल मीडियावर संतापाच्या भरात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना एमबाप्पेंनी, “तुम्ही निकृष्ट महिला आहात आणि त्या पदासाठी पात्र नाही,” अशी टिप्पणी केली होती. यानंतर हा वाद अधिकच चिघळला.

अमारिला यांनी खुल्या पत्रातून कबूल केले की, पराभवाच्या निराशेत त्यांनी भावनेच्या भरात पोस्ट केली होती. मात्र, आपण चुकीचे वागत असल्याची जाणीव होताच ती पोस्ट तात्काळ हटवली. त्याचवेळी एमबाप्पेंनीही आपले वक्तव्य मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी, अशी त्यांनी मागणी केली.

आपण लोकांनी निवडून दिलेली सिनेटर असल्याचे सांगत अमारिला म्हणाल्या, “मला न ओळखता माझा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. एका महिला लोकप्रतिनिधीचा अवमान करणे हे लिंगभेदावर आधारित हिंसाचाराचे उदाहरण आहे.”

दरम्यान, या वादात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी एमबाप्पेंना पाठिंबा दिला. अमारिला यांच्या कथित वांशिक टिप्पण्यांचा निषेध करत त्यांनी फुटबॉलमध्ये वंशवादाला कोणतीही जागा नसल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे विश्वचषकानंतरचा फुटबॉलविश्वातील सर्वात चर्चेचा वाद निर्माण झाला असून, एमबाप्पे सार्वजनिक माफी मागणार की कायदेशीर लढाईला सामोरे जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version