भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार आणि आपल्या नेतृत्वाखाली भारताला टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून देणारा सूर्यकुमार यादव याने सोशल मीडियावर आपल्या नावाने पसरवल्या जात असलेल्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या विधानांवर अखेर मौन सोडले आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर)वरील पोस्टद्वारे त्याने अशा कोणत्याही विधानाचा इन्कार करत भारतीय संघाला आपला कायम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
सूर्यकुमार यादवने पोस्टमध्ये म्हटले, “भारतीय संघासाठी मला नेहमीच आनंद वाटतो आणि मी त्यांना नेहमी शुभेच्छा देत असतो. संघातील प्रत्येक खेळाडू देशासाठी सर्वस्व पणाला लावत आहे आणि त्यांना माझा नेहमीच पूर्ण पाठिंबा असेल.”
त्याने युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याच्यासाठीही खास संदेश दिला. “वैभव, तू एका रोमांचक प्रवासाची सुरुवात करत आहेस. प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि देशाचा अभिमान वाढवत राह,” असे तो म्हणाला.
सोशल मीडियावर आपल्या नावाने फिरणाऱ्या कथित विधानांबाबत सूर्यकुमारने स्पष्ट शब्दांत सांगितले, “माझ्या नावाने एक खोटे विधान ऑनलाइन पसरवले जात आहे. मी असे कोणतेही विधान केलेले नाही किंवा त्याला माझी मान्यता नाही. कृपया पडताळणी न केलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि ती पुढे पाठवू नका.”
तो पुढे म्हणाला, “भारतीय क्रिकेट, माझे सहकारी खेळाडू आणि या खेळाबद्दलचा माझा पाठिंबा हा माझ्या नावाने खोटेपणाने जोडल्या जाणाऱ्या विधानांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.”
अलीकडे सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवच्या नावाने काही भ्रामक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यामध्ये टी-२० संघाचे कर्णधारपद गमावल्याबाबत आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीबाबत कथित प्रतिक्रिया दिल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सूर्यकुमारच्या या अधिकृत पोस्टनंतर त्या सर्व दाव्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकत सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर त्याची वैयक्तिक फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आयपीएलमधील त्याची कामगिरीही साधारण राहिल्याने त्याला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि नंतर संघाबाहेरही ठेवण्यात आले.
