आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मोहिमेला सुरुवातीलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची अधिकृत पुष्टी केली असून, स्टार्कची पुनरागमन त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. गेल्या १२ महिन्यांतील मोठ्या वर्कलोडमुळे ३६ वर्षीय स्टार्कला काळजीपूर्वक व्यवस्थापित केले जात आहे. त्याने नुकतेच अॅशेस मालिकेतील सर्व ५ कसोटी सामने खेळले होते, तसेच बिग बॅश लीगच्या अंतिम टप्प्यातही सहभाग घेतला होता.
स्टार्कच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसू शकतो, कारण नवीन चेंडू आणि डेथ ओव्हर्समध्ये सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो पॉवरप्ले आणि शेवटच्या षटकांत प्रभाव टाकणाऱ्या मोजक्या गोलंदाजांपैकी एक मानला जातो.
दरम्यान, फक्त स्टार्कच नव्हे तर पॅट कमिन्स (सनरायझर्स हैदराबाद) आणि जोश हेजलवूड (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) हे देखील त्यांच्या संघांसाठी सुरुवातीच्या सामन्यांत उपलब्ध राहणार नाहीत, ज्यामुळे संबंधित संघांनाही फटका बसणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने स्टार्कला आयपीएल २०२५ मेगा लिलावात ११.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मागील हंगामात त्याने ११ सामन्यांत १४ विकेट घेतल्या होत्या. इकॉनॉमी रेट जास्त असला तरी मोठ्या सामन्यांत प्रभाव टाकण्याची त्याची क्षमता संघासाठी महत्त्वाची ठरली आहे.
