इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम मार्चपासून सुरू होणार असून, त्याआधीच माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आगामी मोसमासाठी तयारी सुरू केली आहे.
४४ वर्षीय धोनी सलग १७व्यांदा चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाकडून खेळताना दिसणार आहेत. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (जेएससीए)ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘माही’ पॅड घालून नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसत आहेत. सरावासाठी सज्ज होत असताना ते जेएससीएचे सचिव सौरभ तिवारी यांच्याशी संवाद साधताना देखील दिसतात.
जेएससीएने धोनीला आपला गौरव म्हणून संबोधत इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,
“पाहा कोण परत आलंय. जेएससीएचा अभिमान – महेंद्रसिंग धोनी.”
महेंद्रसिंग धोनी यांनी २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते केवळ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसले आहेत. धोनी हे सीएसकेच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंपैकी एक मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेने तब्बल ५ आयपीएल विजेतेपदे पटकावली आहेत.
मागील मोसमात चेन्नई सुपर किंग्सचे प्रदर्शन निराशाजनक ठरले होते. संघाने १४ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकले आणि गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. धोनींनी त्या हंगामात १४ सामन्यांच्या १३ डावांत २४.५० च्या सरासरीने १९६ धावा केल्या होत्या. मात्र त्यांना एकही अर्धशतक करता आले नव्हते.
तरीही धोनी हे आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यांनी आतापर्यंत दोन फ्रँचायझीसाठी एकूण २७८ सामने खेळले आहेत. २४२ डावांत त्यांनी ३८.८० च्या सरासरीने ५,४३९ धावा केल्या असून, त्यांचा सर्वोच्च स्कोअर ८४* इतका आहे. या काळात त्यांनी २४ अर्धशतके झळकावली आहेत.
धोनींच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी धोनींना पद्म श्री (२००९), पद्म भूषण (२०१८) आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (२००८) देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
