मुंबईतील उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमीच प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असलेल्या नवोदित मुंबई श्रीचा सोहळा येत्या शनिवारी २९ नोव्हेंबरला गोरेगाव पश्चिमेच्या शास्त्री नगर मैदानात रंगणार आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या मान्यतेने अजय विचारे, उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी शेकडो नवोदित शरीरसौष्ठवपटू तयारी करत असल्यामुळे खेळाडूंचा विक्रमी सहभाग पाहायला मिळेल, त्याचप्रमाणे यावेळी स्पर्धेसाठी नवोदित खेळाडू प्रचंड संख्येने तयारीत करीत असून प्रत्येक गटात ४० ते ५० खेळाडू उतरणार असल्याची माहिती बृहन्मुबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई शरीरसौष्ठवाला नवे खेळाडू मिळणार आहेत, हे विशेष. त्यामुळे यंदा गोरेगाव पश्चिमेला नवोदित शरीरसौष्ठवपटूंचे आखीवरेखीव थरार पाहायला मिळणार हे निश्चित आहे.
दिवसेंदिवस शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. त्यातच फिटनेसच्या गुलाबी वातावरणात डंबेल्स मारून बेटकुळ्या काढण्याचे प्रमाणही तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेय. अशाच हौशी आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी दरवर्षी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या अजय विचारे यांनी या स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले आहे.
स्पर्धकांचा मोठ्या संख्येने सहभाग असल्यामुळे खेळाडूंची वजन तपासणी त्याचदिवशी दुपारी १ ते ४ च्या दरम्यान स्पर्धास्थळी घेतली जाणार आहे. स्पर्धेला वेळेचे बंधन असल्यामुळे २५० च्या वरती खेळाडूंचा सहभाग असलेली स्पर्धा वेळेत संपन्न व्हावी म्हणून सायंकाळी पाच वाजताच सुरू करणार असल्याचे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस. राजेश सावंत यांनी सांगितले.
हे ही वाचा:
बास्केटबॉलचा खांब अंगावर कोसळून खेळाडूचा मृत्यू
अरुणाचल प्रदेश भारताचा आहे; सत्य बदलू शकत नाही
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी उमरला आश्रय देणारा सातवा आरोपी अटक
“तुम्ही सैन्यासाठी अयोग्य आहात” सर्वोच्च न्यायालयाने ख्रिश्चन अधिकाऱ्याला असे का म्हटले?
नवोदित खेळाडूंना उर्जा मिळावी म्हणून संघटनेनी लाखाची रोख बक्षिसेही जाहीर केली आहेत. एकंदर सात गटांत खेळल्या जाणार््या या स्पर्धेत प्रत्येक गटात अव्वल पाच खेळाडूंना ५, ४, ३, २ आणि १ हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेचा विजेता १५ हजार रूपयांचा मानकरी ठरेल, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई शरीरसौष्ठवाला नवे खेळाडू मिळणार आहेत, हे विशेष.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी किट्टी फणसेका (९८२०४४९५१३), सुनील शेगडे (९२२३३४८५६८), विशाल परब (८९२८३१३३०३), राजेश निकम (९९६९३६९१०८) राम नलावडे (९८२०६६२९३२), किरण कुडाळकर (९८७०३०६१२७), यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन खेळाडूंना करण्यात आले आहे.
