जर्मनीचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलरक्षक ऑलिव्हर कान यांनी लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या ऐतिहासिक प्रतिस्पर्धेचे भरभरून कौतुक करत, फुटबॉलमध्ये अशी स्पर्धा पुन्हा पाहायला मिळणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे.
फीफा विश्वचषक २०२६ दरम्यान जी५ नेटवर्कवर तज्ज्ञ म्हणून बोलताना कान म्हणाले, “क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांनी जवळपास दोन दशकं एकमेकांना अधिक चांगले खेळण्यासाठी प्रेरित केले. प्रत्येक हंगामात त्यांनी आपल्या कामगिरीची पातळी आणखी उंचावली. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्धेची पुनरावृत्ती फुटबॉलमध्ये कदाचित पुन्हा कधीच होणार नाही.”
२००२ च्या विश्वचषकाची आठवण सांगताना कान म्हणाले की, तो त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या अनुभवांपैकी एक होता. “अंतिम सामना गमावल्याची खंत आजही आहे. खेळाडू म्हणून तुम्हाला नेहमी जिंकायचे असते, विशेषतः विश्वचषक. मात्र, कालांतराने त्या प्रवासाचे, संघभावनेचे आणि सहकाऱ्यांसोबतच्या आठवणींचे महत्त्व अधिक जाणवते. गोलरक्षक म्हणून गोल्डन बॉल जिंकणे मोठा सन्मान होता, पण तोही मी विश्वचषक ट्रॉफीसाठी आनंदाने बदलला असता,” असे त्यांनी सांगितले.
युवा गोलरक्षकांना सल्ला देताना कान म्हणाले, “शिकत राहा, सातत्याने प्रगती करा आणि दबावाचा आनंद घ्यायला शिका. विश्वचषकात संपूर्ण जग तुमच्याकडे पाहत असते. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, कारण एकच क्षण संपूर्ण स्पर्धेचे चित्र बदलू शकतो.”
लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी क्लब फुटबॉलमध्ये जवळपास दोन दशकं वर्चस्व गाजवत असंख्य विक्रम केले. मात्र, विश्वचषकात दोघे कधीही आमनेसामने आले नाहीत. सध्याचा फीफा विश्वचषक त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक मानला जात असल्याने, दोन्ही दिग्गजांकडून आणखी एक संस्मरणीय कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे.
