वानखेड़े स्टेडियम येथे गुरुवारी झालेल्या भारत-इंग्लंड टी-२० वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यादरम्यान तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या एका इसमाला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने सापळा रचून अटक केली. जहीर कमालुद्दीन बामने (५१) असे अटक आरोपीचे नाव असून तो एक हजार रुपयांचे तिकीट तब्बल २५ हजार रुपयांना विकत असल्याचे उघड झाले आहे.
डोंगरी येथील जयेश रमेश अय्यर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. जयेश हे मित्रांसह सामना पाहण्यासाठी तिकीट शोधत असताना जहीर बामने हा तिकीट महागड्या दरात विकत असल्याची माहिती त्यांना मिळाली. संपर्क साधल्यावर आरोपीने तिकीटांची किंमत दररोज बदलत असून ती आयसीसीने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त असेल, असे सांगितले. ४ मार्च रोजी झालेल्या चर्चेत त्याने एका तिकीटासाठी २५ हजार रुपयांची मागणी करत पैसे घेण्यासाठी डॉकयार्ड रोड परिसरात बोलावले.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी
शेअर बाजारात दमदार उसळी! सेन्सेक्स ९०० अंकांनी झेपावला
शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार जाणार राज्यसभेवर
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; रशियन तेलाचे टँकर भारताकडे वळले
संशय आल्याने जयेश यांनी संभाषणाची ध्वनिमुद्रिका तयार करून ती क्राइम ब्रँचचे निरीक्षक अरुण थोरात यांना दिली. त्यानंतर अँटी एक्सटॉर्शन सेलने सापळा रचला. जयेश यांना बनावट नोटांचे बंडल देण्यात आले, ज्यामध्ये वर-खाली खरे ५०० रुपयांचे नोट ठेवण्यात आले होते.
ठरल्याप्रमाणे डॉकयार्ड रोड येथील नवाब हयात मशिदीजवळ गनी बिल्डिंग परिसरात आरोपी पैसे स्वीकारून १० तिकीट देण्याच्या तयारीत असतानाच साध्या वेशातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वानखेडे स्टेडियममधील विविध पॅव्हेलियनची १० मूळ तिकीटे आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपीने आतापर्यंत आठ तिकीटे काळ्या बाजारात विकल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडे तिकीटे कशी आली आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र मनोरंजन शुल्क अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
