पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीदरलंड दौऱ्यात तेथील क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख करत भारतीय समुदायाच्या योगदानाचे कौतुक केले. क्रिकेटने जगातील विविध देशांना जोडण्याचे काम केले असून नीदरलंड क्रिकेटमध्येही भारतीय वंशाच्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी म्हटले.
मोदी यांनी टी-२० विश्वचषक २०२६चा उल्लेख करताना नीदरलंड संघाच्या कामगिरीचेही कौतुक केले. भारताने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असले तरी नीदरलंडने भारतीय संघासह अनेक बलाढ्य संघांना चांगली झुंज दिली होती, असे त्यांनी सांगितले.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये नीदरलंडचा समावेश भारत, अमेरिका आणि पाकिस्तानसोबत गट-अ मध्ये होता. या स्पर्धेत नीदरलंडने नामिबियावर विजय मिळवला होता, तर भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सर्व सामन्यांमध्ये संघाने प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर दिली होती.
नीदरलंडने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही प्रभावी कामगिरी केली होती. भारतात झालेल्या त्या स्पर्धेत त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसारख्या संघांविरुद्ध महत्त्वाचे विजय मिळवले होते.
नीदरलंड संघातील आर्यन दत्त, तेजा निदामानुरू आणि विक्रमजीत सिंग हे भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. ऑफस्पिनर आर्यन दत्तने २०२१ मध्ये नीदरलंडकडून पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत ५३ वनडे आणि ३० टी-२० सामने खेळले आहेत.
