इतिहासाच्या उंबरठ्यावर रोहित शर्मा!

इतिहासाच्या उंबरठ्यावर रोहित शर्मा!

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला १३ जूनपासून धर्मशाला येथे सुरुवात होत आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा एका ऐतिहासिक विक्रमाचा मानकरी ठरण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पार केल्यानंतर रोहितला मालिकेसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे धर्मशालाच्या मैदानावर तो उतरला, की भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठे पान नव्याने लिहिले जाईल.

३७ वर्षांचा विक्रम मोडणार!

अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला वनडे सामना खेळताच रोहित शर्मा भारताकडून वनडे क्रिकेट खेळणारा सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरेल. सध्या हा विक्रम माजी अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांच्या नावावर आहे. अमरनाथ यांनी वयाच्या ३९ वर्षे ३६ दिवस असताना आपला अखेरचा वनडे सामना खेळला होता.

मात्र १३ जून रोजी मैदानात उतरताना रोहितचे वय ३९ वर्षे ४४ दिवस असेल. त्यामुळे तब्बल ३७ वर्षांपासून अबाधित असलेला अमरनाथ यांचा विक्रम इतिहासजमा होणार आहे.

जागतिक विक्रमाचा विचार केला तर नेदरलँड्सचे नोलन क्लार्क हे वनडे क्रिकेटमधील सर्वात ज्येष्ठ खेळाडू आहेत. त्यांनी ४७ वर्षे २५७ दिवस वयात वनडे सामना खेळला होता.

अफगाणिस्तानविरुद्ध रोहितची आकडेवारी दमदार

रोहित शर्मा आणि अफगाणिस्तान यांचे समीकरण वनडे क्रिकेटमध्ये विशेष राहिले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या ३ वनडे सामन्यांत रोहितने ७५ च्या सरासरीने आणि १२७ च्या स्ट्राईक रेटने १५० धावा केल्या आहेत. यामध्ये एका शानदार शतकाचाही समावेश आहे.

त्यामुळे धर्मशालामध्ये पुन्हा एकदा ‘हिटमॅन’चा स्फोट पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना आशा आहे.

न्यूझीलंड मालिकेतील निराशा विसरण्याची संधी

यावर्षीच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत रोहितला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धची मालिका त्याच्यासाठी पुनरागमनाची मोठी संधी मानली जात आहे.

विशेष म्हणजे या मालिकेत भारताला विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांची साथ मिळणार नाही. विराट हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तर हार्दिक डाव्या पायाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. विराटच्या जागी युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याची संघात निवड करण्यात आली आहे.

चाहत्यांच्या नजरा रोहितवर

संघातील दोन प्रमुख खेळाडू अनुपस्थित असल्याने भारतीय फलंदाजीची सर्वाधिक जबाबदारी रोहित शर्मावर असणार आहे. एकीकडे ऐतिहासिक विक्रमाची संधी, तर दुसरीकडे मालिकेत दमदार सुरुवात करण्याचे आव्हान… अशा दुहेरी दबावात रोहित मैदानात उतरणार आहे.

आता धर्मशालाच्या थंड वातावरणात ‘हिटमॅन’ची बॅट तुफान धावांचा वर्षाव करते का आणि विक्रमासह भारताला विजयी सुरुवात करून देते का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version