भारत ‘अ’ संघाचा युवा डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याने श्रीलंका ‘अ’ विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची पुन्हा एकदा प्रचिती दिली. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताची आघाडीची फलंदाजी कोसळल्यानंतर साई सुदर्शनने संयमी, परिपक्व आणि जबाबदारीची खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने अवघ्या १३० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि अखेरीस १७५ चेंडूत १३२ धावांची बहुमोल खेळी साकारली. या खेळीत त्याने १९ चौकारांची आतषबाजी करत श्रीलंकन गोलंदाजांचा प्रभावी सामना केला.
भारताच्या डावाची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. सलामीवीर आयुष पांडेने ६४ चेंडूंचा सामना करत २५ धावा केल्या, तर देवदत्त पडिक्कल अवघ्या ७ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने काही आकर्षक फटके खेळले, मात्र त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो ५३ चेंडूत २२ धावा करून माघारी परतला. अव्वल फळीतील फलंदाज अपयशी ठरत असताना साई सुदर्शनने एका बाजूने खिंड लढवत भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
हे ही वाचा:
पुस्तकाच्या ‘कृष्ण’ नावावरून वादंग; एनसीईआरटीने दिले स्पष्टीकरण
आईस्क्रीम घेण्याच्या नादात बाल्कनीवरून कोसळला युवक
विमानतळावर प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकाचा पर्दाफाश
भारतावर ॲमेझॉनचा ₹४.१ लाख कोटींचा विश्वास!
साई सुदर्शनची ही खेळी केवळ शतकापुरती मर्यादित राहिली नाही, तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या सातत्याचाही ठसा उमटवला. हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील नववे शतक ठरले. विशेष म्हणजे त्याने केवळ ४१ व्या प्रथम श्रेणी सामन्यात हा टप्पा गाठला आहे. त्याच्या नावावर आता १० अर्धशतकांचीही नोंद आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ६९ डावांत २,००० हून अधिक धावा केल्या असून त्याची फलंदाजी सरासरी जवळपास ४० इतकी आहे. या फॉरमॅटमधील त्याची सर्वोच्च खेळी २१३ धावांची आहे.
भारत ‘अ’ संघासाठीही साईची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने भारत ‘अ’ कडून खेळलेल्या ७ सामन्यांतील १२ डावांत ३८३ धावा केल्या असून त्याची सरासरी ३१.९१ इतकी आहे. याआधी त्याने तीन अर्धशतके झळकावली होती आणि आता या शानदार शतकाची भर पडली आहे.
साई सुदर्शनची दमदार खेळी अखेर चमिका गुणशेखरने संपुष्टात आणली. मात्र त्याआधी त्याने भारताला मजबूत स्थितीत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम केले.
ऑगस्ट महिन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत साई सुदर्शनचा सध्याचा जबरदस्त फॉर्म भारतीय संघासाठी सकारात्मक संकेत मानला जात असून, आगामी कसोटी मालिकेतही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
