मंगळवारची सकाळ भारतीय बॅडमिंटन चाहत्यांसाठी थोडी निराशाजनक ठरली. कारण देशातील आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने खेळातून निवृत्ती जाहीर केली. तिच्या कमबॅकची आशा धरून बसलेल्या चाहत्यांना त्यामुळे धक्का बसला.
सायनाच्या या निर्णयानंतर तिच्या दमदार कारकिर्दीसाठी सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार ऑलराउंडर युवराज सिंह यानेही सायनाचं मनापासून कौतुक केलं आहे.
युवराज सिंहने ‘एक्स’ (ट्विटर)वर लिहिलं,
“खूप छान खेळलास सायना. तुझ्या शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन. तू भारतीय बॅडमिंटन पुढे नेलंस आणि एका संपूर्ण पिढीला प्रेरणा दिलीस. पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा.”
सायनाने गुडघ्याच्या जुन्या दुखापतीमुळे आणि सततच्या त्रासामुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. जवळपास दोन वर्षे ती स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर होती.
निवृत्तीबाबत सायना म्हणाली,
“जगात नंबर वन होण्यासाठी दिवसाला ८–९ तास सराव करावा लागतो. पण आता माझे गुडघे एक-दोन तासातच साथ सोडायचे. सूज यायची, त्यानंतर जोर लावणं अशक्य व्हायचं. कार्टिलेज पूर्णपणे खराब झालं आहे, आर्थरायटिस आहे. अशा परिस्थितीत कमबॅक खूपच अवघड आहे. त्यामुळे कुटुंब आणि कोचशी चर्चा करून हा कठीण निर्णय घ्यावा लागला.”
सायना नेहवाल भारतीय बॅडमिंटनचा मोठा चेहरा राहिली आहे. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला पदक मिळवून देणारी ती पहिलीच खेळाडू आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक पटकावलं होतं.
हिसारची ही खेळाडू २००८ मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. त्याच वर्षी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरी क्वार्टर फायनल गाठणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. २००९मध्ये इंडोनेशिया ओपन जिंकून बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय बनण्याचा मानही तिच्याच नावावर आहे. पुढे कॉमनवेल्थ गेम्सचं सुवर्ण आणि अनेक आंतरराष्ट्रीय जेतेपदे तिने पटकावली.
२०१५ मध्ये सायनाने जागतिक क्रमवारीत नंबर १ स्थान मिळवत इतिहास रचला. ती असा पराक्रम करणारी पहिली भारतीय महिला ठरली, तर प्रकाश पादुकोणनंतर नंबर १ वर पोहोचणारी दुसरी भारतीय खेळाडू बनली. त्याच वर्षी ती बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली होती — हे यश मिळवणारीही ती भारताची पहिली खेळाडू ठरली.
सायनाच्या निवृत्तीनं एक युग संपलं असलं, तरी तिने भारतीय बॅडमिंटनला दिलेली दिशा आणि प्रेरणा कायम लक्षात राहणार आहे.
