यूएईचा कॅनडावर ५ विकेट्सनी विजय

यूएईचा कॅनडावर ५ विकेट्सनी विजय

टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील २०व्या सामन्यात यूएईने कॅनडावर ५ विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह यूएईने गट-डीच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने ७ बाद १५० धावा केल्या. ३८ धावांवर ३ विकेट्स गमावल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. मात्र हर्ष ठाकेर आणि नवनीत धालीवाल यांनी चौथ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ५८ धावांची भागीदारी करत डाव सावरला.

नवनीतने २८ चेंडूत ४ चौकारांसह ३४ धावा केल्या. त्यानंतर हर्षने श्रेयस मोव्वासह पाचव्या विकेटसाठी २८ चेंडूत ३३ धावा जोडल्या. हर्षने ४१ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांसह ५० धावांची अर्धशतकी खेळी साकारली. कर्णधार दिलप्रीत बाजवाने ११ धावा केल्या. उर्वरित फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत.

यूएईकडून जुनैद सिद्दीकीने ४ षटकांत ३५ धावा देत ५ विकेट्स घेत प्रभावी मारा केला, तर मुहम्मद जवादुल्लाहला १ विकेट मिळाली.

१५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईने १९.४ षटकांत विजय मिळवला. १२ धावांवर कर्णधार मुहम्मद वसीम (४) बाद झाला. त्यानंतर आर्यांश शर्मा आणि अलीशान शराफू यांनी २७ चेंडूत २९ धावा जोडल्या. ६६ धावांवर ४ विकेट्स गमावल्यानंतर यूएई संकटात सापडला होता.

मात्र आर्यांश शर्मा आणि शोएब खान यांनी पाचव्या विकेटसाठी ४२ चेंडूत ८४ धावांची निर्णायक भागीदारी करत सामना यूएईच्या बाजूने झुकवला. आर्यांशने ५३ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ७४ धावांची दमदार खेळी केली, तर शोएब खानने २९ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकारांसह ५१ धावा फटकावत विजयावर शिक्कामोर्तब केले.

कॅनडाकडून साद बिन जफरने १४ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर कलीम आणि जसरकरण सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Exit mobile version