शाहीन शाह आफ्रिदी पुन्हा एकदा मैदानात परतताना दिसत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर शाहीन आफ्रिदीने नेट्समध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव सुरू केला असून, यामुळे आगामी टी-20 विश्वचषक आधी पाकिस्तान संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान संघाच्या वैद्यकीय पॅनलला विश्वास आहे की शाहीन पुढील आठवड्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि पुन्हा आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसेल.
गुरुवारी शाहीनने नेट्समध्ये संपूर्ण रन-अपसह सुमारे १५ मिनिटे गोलंदाजी केली. त्यानंतर तितकाच वेळ फलंदाजीचाही सराव केला. या दरम्यान त्याला कोणतीही अस्वस्थता जाणवली नाही. बिग बॅश लीगदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो विश्वचषकातून बाहेर पडेल अशी भीती व्यक्त केली जात होती, पण आता ती धास्ती दूर झाली आहे.
टेलीकॉम एशिया स्पोर्टच्या अहवालानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) च्या वैद्यकीय पॅनलमधील सूत्रांनी सांगितले,
“शाहीनने पूर्ण रन-अपसह गोलंदाजी केली आणि त्याला कोणतीही अडचण जाणवली नाही. पाकिस्तानसाठी हा अतिशय सकारात्मक संकेत आहे, कारण विश्वचषकात तो आमच्या गोलंदाजी आक्रमणाचा कणा आहे.”
याआधी शाहीनच्या गुडघ्याच्या जुन्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. हाच त्रास २०२२ मध्ये त्याला अनेक महत्त्वाच्या सामन्यांपासून दूर ठेवणारा ठरला होता, विशेषतः इंग्लंडविरुद्धच्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात.
सूत्रांच्या माहितीनुसार, शाहीनचे पुनर्वसन पूर्ण झाले असून तो आता हळूहळू भार वाढवत सराव करत आहे. महिनाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत तो खेळू शकतो, मात्र संघ व्यवस्थापन कोणताही धोका घ्यायला तयार नाही.
पीसीबीचे नवे वैद्यकीय पॅनल प्रमुख डॉ. जावेद मुगल यांनी शाहीनच्या फिटनेसवर लक्ष ठेवले असून त्याच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले आहे. सुरुवातीला १५ ते २५ मिनिटेच गोलंदाजी करावी आणि नंतर कालावधी वाढवावा, असा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला आहे.
२५ वर्षीय शाहीन आफ्रिदीला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट कडून खेळताना डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. हा त्याचा पहिलाच बीबीएल हंगाम फारसा यशस्वी ठरला नाही. चार सामन्यांत त्याला फक्त दोन विकेट्स मिळाल्या, तर एका सामन्यात दोन बीमर टाकल्यामुळे त्याच्यावर तात्पुरती गोलंदाजी बंदीही आली होती.
ब्रिस्बेनमध्ये झालेल्या एमआरआय तपासणीत गंभीर दुखापत आढळली नव्हती, तरीही खबरदारी म्हणून पीसीबीने शाहीनला बीबीएलमधून माघारी बोलावून लाहोरला पाठवले.
आता शाहीनची नेट्समधील ही पुनरागमनाची झलक पाहता, पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी मानली जात आहे.
