‘इतक्या लवकर पुनरागमन होईल, वाटलंच नव्हतं!’ – तिलक वर्मा

‘इतक्या लवकर पुनरागमन होईल, वाटलंच नव्हतं!’ – तिलक वर्मा

दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अष्टपैलू तिलक वर्मा यांनी बीसीसीआय आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे आभार मानले. त्यांच्या मदतीमुळे अपेक्षेपेक्षा लवकर मैदानावर परतता आल्याचे तिलक यांनी सांगितले.

संघातील आक्रमक फलंदाजीमुळे प्रेरणा मिळाल्याचे सांगत त्यांनी संघातील वातावरण उत्कृष्ट असल्याचे नमूद केले. तसेच, संपूर्ण भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सराव सामन्यात ‘तिलक-तिलक’च्या घोषणांनी आपला आत्मविश्वास वाढवल्याचे त्यांनी सांगितले. हा फक्त वॉर्म-अप सामना असला तरी स्टेडियम खचाखच भरलेले होते. बुधवारी नवी मुंबईत झालेल्या उच्च धावसंख्येच्या सराव सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव करत स्पर्धेपूर्व तयारी दमदार पद्धतीने पूर्ण केली.

“प्रामाणिकपणे सांगायचे तर इतक्या लवकर पुनरागमन करेन, असे वाटले नव्हते. सेंटर ऑफ एक्सलन्स आणि बीसीसीआयचे मी मनापासून आभार मानतो. वर्ल्ड कप खेळणे हे माझे स्वप्न आहे. मैदानात उतरलो आणि चाहत्यांनी माझ्या नावाच्या घोषणा दिल्या, तेव्हा माझा उत्साह दुणावला,” असे तिलक म्हणाले.

ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि इतर फलंदाजांची आक्रमक खेळी पाहून स्वतःलाही धडाकेबाज फलंदाजी करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एवढी मोठी गर्दी सराव सामन्यासाठी येईल, अशी अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद २४० धावांचा भक्कम डोंगर उभारला. ईशान किशनने अवघ्या २० चेंडूत ५३ धावांची तुफानी खेळी केली. अभिषेक शर्मासह त्याने पहिल्या सहा षटकांतच संघाला ८०/१ अशी झपाट्याची सुरुवात करून दिली. त्यानंतर दोघांनी निवृत्त होऊन इतरांना संधी दिली.

तिलकने १९ चेंडूत ४५ धावा करत कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत ६६ धावांची वेगवान भागीदारी केली. अखेरीस अक्षर पटेल, रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्याच्या १० चेंडूत ३० धावांच्या तुफानी खेळीमुळे भारताने मोठी धावसंख्या गाठली.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात मात्र खराब झाली. अर्शदीप सिंगने जॉर्ज लिंडे याला शून्यावर बाद केले. एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन यांनी ६५ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढील फलंदाज झटपट बाद झाल्याने सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स आणि मार्को यान्सेन यांनी प्रयत्न केले, पण अखेरीस आफ्रिका ३० धावांनी मागे पडली.

आता भारताचे लक्ष शनिवारी अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्याकडे लागले आहे.

Exit mobile version