अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित व्हाइट हाऊस कॉरेस्पोंडेंट्स डिनर दरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. गोळीबार होताच त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही घटना शनिवारी रात्री घडली. कार्यक्रम सुरू असताना अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू येताच उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे २,५०० हून अधिक पाहुण्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी तातडीने आसरा घेतला. काहींना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले.
हे ही वाचा:
मुंबई 3.O – स्वप्नांच्या नगरीचा पुढचा अध्याय!
अमेरिकेच्या हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार; थोडक्यात बचावले ट्रम्प आणि व्हान्स
स्काईरूट एरोस्पेसचे ‘विक्रम-1’ रॉकेट लॉन्चच्या उंबरठ्यावर
एवढं भरभरून मतदान की, बंगालमध्ये पळून गेलेली बायको नवऱ्याला सापडली!
घटनास्थळी तैनात असलेल्या यूएस सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत हल्लेखोराला काही सेकंदांतच ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने सुरक्षा भेदून कार्यक्रमाच्या परिसरात प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला.
दरम्यान, या हल्लेखोराचा पहिला फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये तो सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिसत असून, त्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती कॅलिफोर्नियाचा असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेत एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला, पण त्याने घातलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचा जीव वाचला. सुदैवाने, इतर कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. घटना घडल्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यात आला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांच्या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. तसेच भविष्यात अशा कार्यक्रमांमध्ये अधिक कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या तपास यंत्रणा हल्लेखोराची ओळख, त्याचा हेतू आणि तो एकटाच होता की त्यामागे मोठे षड्यंत्र आहे का, याचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे अमेरिकेतील उच्चस्तरीय कार्यक्रमांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







