विराट कोहलीच्या शतकाने विक्रमांचा पाऊस

विराट कोहलीच्या शतकाने विक्रमांचा पाऊस

आयपीएल २०२६ मधील ५७व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) ६ विकेट्सने पराभव करत शानदार विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे विराट कोहली! विराटने नाबाद १०५ धावांची तुफानी खेळी करत पुन्हा एकदा आपणच “किंग” असल्याचं सिद्ध केलं.

विराट कोहलीने अवघ्या ६० चेंडूत १७५ च्या स्ट्राईक रेटने खेळताना ११ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याच्या या दमदार खेळीमुळे आरसीबीने लक्ष्य सहज गाठलं. देवदत्त पडिक्कलसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूत ९२ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली.

हे शतक विराटच्या आयपीएल कारकिर्दीतील ९वं शतक ठरलं. विशेष म्हणजे केकेआरविरुद्ध त्याचं हे दुसरं शतक आहे. आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत त्याने जोस बटलरची बरोबरी केली आहे. बटलरनेही केकेआर आणि आरसीबीविरुद्ध प्रत्येकी दोन शतकं झळकावली आहेत.

धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आता आयपीएलमध्ये संयुक्तरित्या सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला आहे. चेस करताना विराटचं हे तिसरं शतक ठरलं. या यादीत त्याच्यासोबत फक्त जोस बटलरच आहे.

टी-२० क्रिकेटमध्येही विराटने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-२० कारकिर्दीतील हे त्याचं १०वं शतक ठरलं असून सर्वाधिक टी-२० शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

याच सामन्यात विराटने टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. विशेष म्हणजे सर्वात कमी डावांत हा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने केवळ ४०९ डावांत १४ हजार धावा पूर्ण केल्या. याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने ४२३ डावांत हा पराक्रम केला होता.

विराटच्या या अविस्मरणीय खेळीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट आता संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. विराट आणि रोहित शर्मा या दोघांनीही प्रत्येकी २१ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

एकंदरीत, रायपूरच्या मैदानावर विराट कोहलीने केवळ शतक ठोकलं नाही, तर विक्रमांची अक्षरशः आतषबाजीच केली. “किंग कोहली” पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतल्याचं चित्र पाहायला मिळालं असून आरसीबी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Exit mobile version