झेल सुटले, सामना हातातून गेला!

झेल सुटले, सामना हातातून गेला!

महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात ६ विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी १५९ धावांचे लक्ष्य देऊनही भारतीय संघाला क्षेत्ररक्षणातील चुका महागात पडल्या. पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी झेल सुटल्यामुळे सामना हातातून गेल्याची खंत व्यक्त केली.

भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १५८ धावा उभारल्या होत्या. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय क्षेत्ररक्षणातील त्रुटींचा पुरेपूर फायदा घेत सामना आपल्या बाजूने झुकवला.

दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर ताझमिन ब्रिट्स हिला १८ धावांवर जीवदान मिळाले, तर धडाकेबाज फलंदाज मारिझान कॅप हिला दोन वेळा झेल सोडल्यामुळे मोठी संधी मिळाली. कॅपने या संधीचे सोने करत नाबाद ८१ धावांची खेळी साकारली आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला.

सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत म्हणाल्या, “मध्यंतरात आम्हाला काही महत्त्वाच्या संधी मिळाल्या होत्या, पण दुर्दैवाने त्याचा फायदा आम्ही घेऊ शकलो नाही. अशा मोठ्या स्पर्धांमध्ये मिळालेल्या संधींचे रूपांतर यशात करणे अत्यंत महत्त्वाचे असते. आज मात्र नशीब आमच्या बाजूने नव्हते.”

पराभवामुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा काहीशा कठीण झाल्या असल्या तरी संघासमोर अजून दोन साखळी सामने शिल्लक आहेत. २५ जूनला बांगलादेश आणि २८ जूनला ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारताचे सामने होणार आहेत. या सामन्यांबाबत हरमनप्रीत यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

“आमच्याकडे अजून दोन सामने आहेत. आता पुढील आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या चुका तपासू आणि पुढील सामन्यासाठी सर्वोत्तम संघसंयोजन निवडू,” असे त्या म्हणाल्या.

गोलंदाजीत श्री चरणी हिने उत्कृष्ट कामगिरी करत ४ षटकांत २४ धावा देत ३ बळी घेतले, तर शेफाली वर्मा हिने २२ धावांत १ बळी मिळवला. या दोघींच्या कामगिरीचे कौतुक करताना हरमनप्रीत म्हणाल्या की, त्यांनी दबाव निर्माण केला; मात्र इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

मारिझान कॅपच्या खेळीबद्दल बोलताना भारतीय कर्णधार म्हणाल्या, “तिने अप्रतिम फलंदाजी केली. मात्र तिने आम्हाला दोन महत्त्वाच्या संधी दिल्या होत्या. त्या वेळी आम्ही झेल पकडले असते, तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकला असता.”

भारतासाठी आता पुढील दोन्ही सामने ‘करो किंवा मरो’ स्वरूपाचे बनले असून उपांत्य फेरीचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी विजय अनिवार्य असणार आहे.

Exit mobile version