राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थिती, कामकाजातील सहभाग आणि सार्वजनिक वक्तव्यांमध्ये संयम राखण्याबाबत त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे अशा प्रकाराला मुळीच थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही मंत्र्यांच्या वारंवार गैरहजेरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास, लक्षवेधी सूचना, विधेयकांवरील चर्चा आणि विभागाशी संबंधित मुद्द्यांवेळी मंत्री अनुपस्थित राहिल्यास त्याचा थेट परिणाम सरकारच्या कामकाजावर होतो. विरोधकांना सरकारला कोंडीत पकडण्याची संधी मिळते आणि जनतेमध्येही चुकीचा संदेश जातो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे प्रत्येक मंत्र्याने आपापल्या खात्याशी संबंधित विषयांवेळी सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे त्यांनी बजावले.
हे ही वाचा:
‘लिओनेल मेस्सी सर्वात महान फुटबॉलपटू’
क्रांती गौडच्या आईने दागिने विकून क्रिकेट किट घेतली!
गोलंदाज श्री चरणी एका वर्षातच नंबर वन
भारताची सर्व राफेल सुस्थितीत, पाकिस्तानचा दावा पडला खोटा
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांवरही नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत महायुतीतील काही नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या विधानांमुळे राजकीय वाद निर्माण झाले होते. अनेकदा सरकारची अधिकृत भूमिका आणि मंत्र्यांची वैयक्तिक मते यामध्ये विसंगती दिसून आल्याने विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. याची गंभीर दखल घेत फडणवीस यांनी मंत्र्यांना माध्यमांसमोर बोलताना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.
सरकारच्या धोरणांबाबत किंवा संवेदनशील विषयांबाबत कोणत्याही मंत्र्याने स्वतंत्र भूमिका मांडू नये. मतभेद असतील तर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा अंतर्गत चर्चेत मांडावेत, मात्र सार्वजनिक मंचावरून सरकारची अडचण वाढवणारी विधाने टाळावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याने अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत मंत्र्यांनी एकसंघपणे काम करणे, सभागृहात सक्रिय राहणे आणि सरकारची भूमिका प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारच्या कामकाजात शिस्त आणि समन्वय राखणे ही प्रत्येक मंत्र्याची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या स्पष्ट आणि कडक भूमिकेमुळे महायुती सरकारमध्ये शिस्तीचा संदेश गेला असून, आगामी अधिवेशनात गैरहजर राहणारे मंत्री आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वीच सरकारमध्ये शिस्तीचा ‘डोस’ देत फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांना सज्ज राहण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.







