महिला प्रीमियर लीग २०२६ हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने संघाने आपल्या कोचिंग स्टाफला अधिक बळकट करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने माजी भारतीय क्रिकेटपटू अनघा देशपांडे यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्या लिसा कीटली यांच्या जागी ही जबाबदारी सांभाळणार आहेत.
नियुक्तीनंतर बोलताना अनघा देशपांडे म्हणाल्या,
“हा माझ्यासाठी अतिशय मोठा आणि आनंदाचा क्षण आहे. येथे मला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, ज्या पुढील वाटचालीसाठी उपयोगी ठरतील. गेल्या तीन वर्षांपासून हा संघ ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. यंदा संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देईन.”
दिल्ली कॅपिटल्सने आगामी हंगामासाठी जेमिना रॉड्रिग्ज हिला संघाची नवी कर्णधार म्हणून घोषित केले आहे. यावर अनघा म्हणाल्या,
“मी जेमिमाहला मुंबई संघाचे नेतृत्व करताना पाहिले आहे. तिला नेता म्हणण्यासाठी कोणत्याही टॅगची गरज नाही. ती कर्णधारपदासाठी पूर्णपणे पात्र आहे.”
दिल्ली कॅपिटल्समध्ये रुजू होण्यापूर्वी अनघा देशपांडे उत्तराखंड संघाच्या प्रशिक्षक म्हणून काम करत होत्या. तसेच बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे आयोजित शिबिरांमध्ये त्या झोनल आणि नॅशनल स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळत होत्या.
अनघा देशपांडे यांनी २००८ ते २०१४ या कालावधीत भारतीय संघासाठी २३ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळले. दोन्ही फॉरमॅट मिळून त्यांच्या नावावर ४८३ धावा आहेत. त्या यष्टीरक्षक-फलंदाज होत्या. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी १६ झेल आणि २१ स्टम्पिंग केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी महाराष्ट्र, रेल्वे, गुजरात आणि पुडुचेरी संघांचे प्रतिनिधित्व केले.
दरम्यान, आयएएनएसला मिळालेल्या माहितीनुसार १९९३ ते २००५ या काळात भारतासाठी ८ कसोटी आणि ६५ एकदिवसीय सामने खेळलेल्या Anju Jain या दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त होण्याची शक्यता आहे. अंजू जैन यांनी WPL च्या पहिल्या दोन हंगामांत यूपी वॉरियर्सच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले असून त्या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक आणि महिला निवड समितीच्या अध्यक्षही राहिल्या आहेत.
