एसी बंद पडताच विमानात घुसमट; स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांचा संताप

दिल्ली-पुणे विमान उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाडाने रखडले

एसी बंद पडताच विमानात घुसमट; स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांचा संताप

दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या स्पाइसजेटच्या SG 105 या विमानात एसी बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड उकाडा आणि घुसमट सहन करावी लागली. ११ ऑगस्टच्या रात्री विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच ही तांत्रिक अडचण निर्माण झाली. विमानात चढल्यानंतर एसी सुरू न झाल्याने बंद केबिनमध्ये तापमान वाढत गेले आणि अनेक प्रवासी अक्षरशः घामाने हैराण झाले. या विमानात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांचाही समावेश होता.

विमानाला रात्री साडेनऊच्या सुमारास उड्डाण करायचे होते; मात्र ते आधीच विलंबाने रात्री साडेअकराच्या आसपास रनवेवर नेण्यात आले. त्यावेळीही एसीची समस्या कायम होती. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, जवळपास ४० ते ४५ मिनिटे केबिनमध्ये उकाडा आणि अस्वस्थतेचे वातावरण होते. काही प्रवाशांची प्रकृतीही बिघडल्याचे सांगण्यात आले. अखेर प्रवाशांनी आपल्या जागेवरून उठून विमानातील परिस्थितीविरोधात संताप व्यक्त केला आणि विमानाचे दरवाजे उघडून बाहेर जाण्याची मागणी केली.
हे ही वाचा:
इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

एसी बंद पडताच विमानात घुसमट; स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांचा संताप

कर्नाटकमध्ये गुटखा-पानमसाल्यावर वर्षभराची बंदी

फिचचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास; ‘BBB-’ रेटिंग कायम

प्रवाशांच्या या विरोधानंतर विमान परत बेवर आणण्यात आले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. त्यामध्ये प्रवासी हाताने वारा घेताना आणि विमानातील उकाड्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. काही अहवालांनुसार, १०० हून अधिक प्रवाशांनी विमानाने पुढे प्रवास करण्यास नकार दिला.

दरम्यान, या घटनेवर स्पाइसजेटने स्पष्टीकरण दिले आहे. एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, उड्डाणाच्या अगदी आधी विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर कंपनीने तातडीने दुसरे विमान उपलब्ध करून दिले आणि प्रवाशांना पुण्याकडे रवाना करण्यात आले. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने खेदही व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे विमानाच्या तांत्रिक तपासणीसह प्रवाशांच्या सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. विमान उड्डाणासाठी तयार करण्यापूर्वी केबिनमधील एसीसारख्या अत्यावश्यक यंत्रणांची योग्य तपासणी झाली होती का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्रवाशांसाठी विमानप्रवास हा केवळ वेळेवर पोहोचण्याचा विषय नसून सुरक्षित, आरामदायी आणि मूलभूत सुविधा सुनिश्चित करण्याची जबाबदारीही एअरलाइनची आहे, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

Exit mobile version