बँक लॉकर उघडला अन् धक्काच बसला; ५० लाखांचे दागिने गायब

कानपूरमधील महिलेचा दावा

बँक लॉकर उघडला अन् धक्काच बसला; ५० लाखांचे दागिने गायब

बँकेच्या लॉकरमध्ये दागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याचा विश्वास असलेल्या कानपूरमधील एका महिलेला लॉकर उघडल्यानंतर मोठा धक्का बसला. अनेक वर्षांनंतर लॉकर उघडण्यासाठी गेल्यानंतर त्यात ठेवलेले सुमारे ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू गायब असल्याचा दावा तिने केला आहे. या प्रकरणी स्वरूप नगर पोलीस ठाण्यात शाखा व्यवस्थापक आणि इतर बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने २००३ मध्ये तत्कालीन स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या स्वरूप नगर शाखेत लॉकर उघडले होते. स्टेट बँक ऑफ त्रावणकोरचे २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले. महिलेच्या दाव्यानुसार, तिने या लॉकरमध्ये सुमारे ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या.

पतीच्या निधनानंतर संबंधित महिला लखनौला राहायला गेली. त्यामुळे तिला नियमितपणे कानपूरमधील बँक शाखेत जाणे शक्य झाले नाही. मात्र, तिच्या बँक खात्यातून लॉकरचे शुल्क नियमितपणे वजा होत असल्याने लॉकर कार्यरत असल्याचे तिला वाटत होते. काही काळानंतर तिने लॉकर वापरण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला लॉकर उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, लॉकर उघडताच आत केवळ रिकामा कप्पा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू गायब झाल्याची तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळून दोघांचा मृत्यू

इंदिरा कँटीनच्या स्वयंपाकघरासह गोदामात अस्वच्छता; गोदाम सील, नमुने तपासणीला

राहुल गांधींच्या त्या विदेश दौऱ्यात कोण होते सोबत ? फोटो केला व्हायरल

चित्रपट चालो न चालो, पॉपकॉर्नची कमाई मात्र जोरात

प्राथमिक तपासात संबंधित लॉकर यापूर्वीही उघडण्यात आल्याच्या नोंदी पोलिसांना आढळल्या आहेत. त्यामुळे लॉकर नेमका कधी उघडण्यात आला आणि त्यातील वस्तू कधी गायब झाल्या, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. पोलिसांकडून बँकेची कागदपत्रे, लॉकर वापराच्या नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित दस्तऐवजांची तपासणी केली जात आहे. लॉकरमधील मौल्यवान वस्तू नेमक्या कशा गायब झाल्या आणि यामध्ये कोणाची भूमिका आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version