पाकिस्तानमध्ये १४० मुलांसह २९९ जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये १४० मुलांसह २९९ जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मान्सूनमुळे मुसळधार पावसाने कहर केला आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (NDMA) कडून अलीकडेच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २६ जूनपासून आतापर्यंत १४० मुलांसह किमान २९९ जणांचा मृत्यू झाला असून ७१५ जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, केवळ सोमवारच्या दिवशीच पावसाशी संबंधित घटनांमध्ये ७१५ लोक जखमी झाले, ज्यामध्ये २३९ मुले, २०४ महिला आणि २७२ पुरुषांचा समावेश आहे.

दरम्यान, अचानक आलेल्या पुरामुळं आणि मुसळधार पावसामुळं एकूण १,६७६ घरे नुकसानग्रस्त झाली आहेत, तर ४२८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या पुरामुळे अनेक भागांमध्ये मोठी हानी झाली असून स्थानिक समुदायांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या पाकिस्तानी दैनिक वृत्तपत्राच्या अहवालानुसार, पाकिस्तान हवामान विभागाने (PMD) देशाच्या वरच्या व मधल्या भागांमध्ये पावसाचा सिलसिला सुरूच राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा..

कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच

राहुल गांधीचा ‘अणुबॉम्ब’ तेजस्वी यादव यांच्या घरावरच पडला

राहुल गांधीना न्यायालय म्हणाले, खरे भारतीय असे आरोप करणार नाहीत!

जादूटोण्याच्या संशयावरून व्यक्तीची हत्या, गुप्तांग कापून मृतदेह धरणात फेकला!

सोमवारी कमजोर मान्सून वाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता व मंगळवारी तीव्र पश्चिमी लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. PMD च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार, गुरुवारपर्यंत पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK), गिलगित-बाल्टिस्तान (PoGB), खैबर पख्तूनख्वा (KP), पंजाब आणि इस्लामाबादमध्ये विजांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, “आगामी आठवड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. देशाच्या वरच्या आणि मधल्या भागांमध्ये कमजोर मान्सून वारे सक्रिय आहेत आणि ४ ऑगस्टपासून ते अधिक तीव्र होतील. ५ ऑगस्टला एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येण्याची शक्यता आहे.”

विभागाने ६ ऑगस्ट रोजी ईशान्य बलुचिस्तानच्या अनेक भागांमध्ये पाऊस व वादळाचा इशारा दिला असून, खालच्या भागांमध्ये पूर येण्याची शक्यता व नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विभागाने म्हटले की, “सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे व पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये चितराल, दीर, स्वात, शांगला, मानसेहरा, कोहिस्तान, अ‍ॅबटाबाद, बुनेर, चारसद्दा, नौशेरा, स्वाबी, मर्दान, मुर्री, गलियात, रावळपिंडी, ईशान्य पंजाब आणि पीओकेमधील नाल्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या आठवड्यात इस्लामाबाद, रावळपिंडी, गुजरांवाला, लाहोर आणि सियालकोटमधील खालच्या भागांमध्ये शहरी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांना योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version