बदमाशी केलीत, तर कायद्याचा दंडुका… बंगालमधील पोलिस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल

पोलीस निरीक्षक अजय पाल शर्मा यांचा तृणमूलच्या कार्यकर्त्यांना इशारा

बदमाशी केलीत, तर कायद्याचा दंडुका… बंगालमधील पोलिस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असताना काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा दलांकडून अधिक सतर्कता दाखवण्यात येत आहे. अशातच निवडणूक ड्युटीवर तैनात आयपीएस अधिकारी आणि पोलीस पर्यवेक्षक अजय पाल शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते तृणमूल काँग्रेस (TMC)चे उमेदवार जहांगीर खान यांच्या समर्थकांकडून मतदारांना धमकावल्याच्या तक्रारींवर कडक इशारा देताना दिसतात. या व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसतात, “जर कोणी गुंडागर्दी (बदमाशी) केली, तर त्याच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल.”

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी आरोप केला होता की, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांचे समर्थक मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. या तक्रारींनंतर अजय पाल शर्मा घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी उमेदवार स्वतः उपस्थित नव्हते आणि सुरुवातीला स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी त्यांच्या घराचा पत्ता देण्यास टाळाटाळ केली. नंतर शोध घेतल्यानंतर शर्मा आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी पोहोचण्यात यश मिळवले.

उमेदवाराच्या घरात उपस्थित कुटुंबीयांना संबोधित करताना शर्मा यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, “त्यांना नीट समजावून सांगा. जर लोकांना धमकावल्याच्या तक्रारी येत राहिल्या, तर आम्ही त्यावर योग्य कारवाई करू. कोणीही चुकीचे काम केले किंवा मतदारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही कठोर पावले उचलू.” ते पुढे म्हणाले, “जहांगीर यांना सांगा की वारंवार तक्रारी येत आहेत की त्यांचे लोक इतरांना धमकावत आहेत. असेच सुरू राहिले, तर आम्ही याकडे गंभीरपणे पाहू. नंतर कोणतीही तक्रार येऊ नये.”

तपासणीदरम्यान अजय पाल शर्मा यांनी पाहिले की जहांगीर खान यांच्या निवासस्थानी १४ पोलीस कर्मचारी तैनात होते. जेव्हा त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, तेव्हा कळले की उमेदवाराला ‘वाय श्रेणी’ सुरक्षेखाली १० कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे. या तफावतीवर शर्मा यांनी आक्षेप घेत अतिरिक्त तैनातीबाबत स्पष्टीकरण मागितले आणि नोटीस बजावली. या घटनेनंतर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी शर्मा यांच्या भूमिकेचे समर्थन करत म्हटले की, अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेत स्पष्ट संदेश दिला आहे की निवडणुकीत धमकावण्याची राजकारण सहन केली जाणार नाही.

हे ही वाचा:

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराच्या घरावर टाकला बॉम्ब

सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या मौलानाचे मुंडण, तोंड काळे

दाऊदचा निकटवर्ती डोला भारतात आला!

अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही जहाजं पार करतायत होर्मुझ! कसे ते जाणून घ्या

तर, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसने या कारवाईवर तीव्र टीका केली आहे. पक्षाने निवेदन जारी करून आरोप केला की, संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने लादले असून त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित केले. याचदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, “पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऑब्झर्व्हरच्या नावाखाली रामपूर आणि संभलमध्ये चाचणी घेतलेले आपले एजंट पाठवले आहेत, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. दीदी आहेत आणि दीदीच राहतील!”

Exit mobile version