अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणीचे लैंगिक शोषण करणारा तरुण अयान अहमदचा एक जुना व्हीडिओ समोर आला असून त्याचा वाढदिवस भर रस्त्यात साजरा झाला होता आणि त्याला चक्क स्थानिक पोलिस अधिकारीही उपस्थित असल्याचे त्या व्हीडिओत दिसते.
अयान अहमदने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले आणि त्यांच्यासोबत काढलेले नको त्या अवस्थेतील फोटो, व्हीडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अयान अहमदने १८० मुलींचे असे शोषण केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. आता त्याच्या या जुन्या व्हीडिओमुळे पोलिसही त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सामील असल्यामुळेच तो मुलींशी अशी कृत्ये करण्यास सोकावला असेल असे आरोप केले जाऊ लागले आहेत.
त्याच्या या वाढदिवसाच्या व्हीडिओमध्ये तो बॉस लिहिलेला टीशर्ट घालून केक कापत असल्याचे दिसते. रस्त्यातच टेबल मांडून त्यावर हा केक ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत फटाके फोडून त्याचा वाढदिवस साजरा केल्याचे दिसते. त्याला शुभेच्छा देतानाच पोलिस त्याला केक भरवताना दिसतात.
या पोलिसांमध्ये एपीआय समीर शेख, कॉन्स्टेबल शुभम शर्मा आणि कॉन्स्टेबल मयूर गुरव यांचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र मध्यरात्री रस्त्यावर केक कापण्यासाठी पोलीस कसे काय उपस्थित होते याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा:
पॅरालिम्पिक सुवर्ण विजेत्या सुमित अंतिलचा प्रशिक्षकावर आरोप, नीरज चोप्राचा पाठिंबा
कॉर्पोरेट जिहादप्रकरणी मानवाधिकार आयोगाच्या नोटिसा
रशियन तेलावर अमेरिकेची सवलत वाढवली; भारताला मोठा दिलासा
आरोपी अयानने भर रस्त्यात केक कापला त्या दिवशी पोलिसांनी त्याला का थांबवलं नाही? पोलिसांनीच त्याला शुभेच्छा कशा दिल्या? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात उजेडात आलेल्या ‘सेक्स स्कँडल’ प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आलीये. कन्टेण्ट क्रिएटर असलेला अयान गेल्या ३-४ वर्षांपासूनच स्नॅप चॅट, इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. आयान हा २०१९ पासून स्नॅप चॅटवर सक्रीय होता, तर २०२२ पासून तो इन्स्टाग्रामवर रिल्स बनवत होता. दिसायला स्मार्ट आणि बोलण्यात चतुर असल्यामुळे सोशल मीडियावर महिला मुली त्याच्याकडे आकर्षित होत असत. मॉडर्न लुक, रिल्समुळे मिळणारी प्रसिद्धी आणि महागड्या गाड्या फिरवून आरोपी अयान अहमद महिलांना भुरळ घालत असे. सोशल मीडियावर ओळख वाढल्यानंतर अयान तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर त्यांना भेटायला बोलवून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले जात असत. त्यानंतर या मुलींना ब्लॅकमेल करण्याचा उद्योग तो सुरू करत असे. . फसल्याचं लक्षात आल्यानंतर एखाद्या तरुणीनं भेटायला नकार दिला, तर तो त्यांचे व्हिडिओ व्हायरल करायची धमकी द्यायचा.
आरोपींनी पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणी ४५ सदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
