तेव्हाच संपला हिडमाचा खेळ!

तेव्हाच संपला हिडमाचा खेळ!

जोहार, सगळा पक्ष शरण जाण्यास तयार नाही. कारण अनेक समस्या आहेत, सुरक्षेच्या बाबतीत अनेक धोके आहेत. आमचे प्राधान्यक्रम आणि तुमच्या मदतीने सरकारने हे ठरवावे की, मला कुठे शरण येता येईल. आमच्या सुरक्षेची जर हमी देण्यात आली तर मी तुम्हाला भेटेन. आम्ही मग कुणालाही भेटण्यास तयार आहोत. तब्बल १ कोटींचे इनाम शिरावर असलेल्या मडवी हिडमाचे हे अखेरचे पत्र. एका पत्रकाराला लिहिलेले. त्याच्या या नक्षलवादाच्या प्रवासात त्याच्याशी ओळख झालेला हा अनामिक पत्रकार. ज्याच्या माध्यमातून हिडमा सरकारच्या समोर बंदुका टाकण्यास तयार होता. अगदी हिंदी, तेलुगूमध्ये ऑडिओच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडण्यासही तो तयार होता. पण ती वेळच आली नाही. सुरक्षा यंत्रणांनी हिडमाचा खात्मा केला. सोबत त्याची पत्नी राजे किंवा राजक्का हिचाही सुरक्षा यंत्रणांच्या गोळ्यांनी वेध घेतला.

हिडमाच्या मृत्यूमुळे माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सशस्त्र विंगचा पुरता बीमोड झाला असे मानण्यात येते आहे. आता एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कमांडर त्यांच्याकडे शिल्लक आहेत. माओवादी कम्युनिस्ट पक्षाची केंद्रीय समिती आता दुबळी बनली आहे. अवघे ७ सदस्य आता शिल्लक आहेत. त्यात पॉलीट ब्युरोचे देवजी अर्थात, ठिप्पीरी तिरुपती, मुप्पाला लक्ष्मण राव तथा गणपती, मिसिर बेस्रा यांचा समावेश आहे. गणपतीचे वय आता सत्तरीच्या घरात आहे तर मिसिर बेस्रा हा झारखंडमध्ये अगदी थोड्या नक्षलवाद्यांसह लढतो आहे.

माओवादी कम्युनिस्ट पक्षाला हा मोठा धक्का असला तरी हिडमाचा खात्मा होणार हे निश्चितच होते. ३० नोव्हेंबर २०२५ ही त्याच्या खात्म्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण त्याआधीच, त्याला खेळ खल्लास करण्यात आला. त्याआधी, त्याने शरण येण्याचा एक प्रयत्न केला होता. बस्तरमधील एका पत्रकाराशी त्याने संवाद साधला. त्याला लिहिलेले तेच हे पत्र होते. पत्रकाराने सरकार आणि हिडमा यांच्यात समन्वयकाची भूमिका बजावावी असे त्याला वाटत होते. पण वेळ निघून गेली होती. त्या पत्रकाराने आंध्र प्रदेशमध्ये यावे आणि लपलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावे असे हिडमाने त्याला म्हटले होते. १० नोव्हेंबरचे ते पत्र होते. ३० नोव्हेंबर ही हिडमाच्या खात्म्याची तारीख निश्चित करण्यात आली होती, पण १२ दिवस आधीच त्याचा कार्यभाग संपुष्टात आला.

हिडमाने पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) च्या कुख्यात बटालियन क्रमांक 1 चे नेतृत्व केले होते, हा बस्तरमधून केंद्रीय समितीमध्ये पोहोचलेला एकमेव आदिवासी नेता होता. अर्थात, शहरी नक्षलवाद्यांनी पुस्तकांमधून नक्षलवादाला खतपाणी घालायचे पण प्रत्यक्ष मैदानात लढायचे ते हिडमासारख्या आदिवासी, वनवासींनी. १० नोव्हेंबर रोजी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी त्याच्या आईला भेटून त्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहनही केले, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. हिडमाचे मन वळवण्यासाठी छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा त्याच्या घरी गेले होते. त्याच्या ७० वर्षांच्या आईला भेटले तिनेही आर्जव केले की हिडमाने शरण यावे आणि आपल्या लोकांमध्ये पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यास सुरुवात करावी. पण हिडमाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. गेल्या वर्षीच त्याला माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीत स्थान मिळाले. तेव्हा त्याच्यावर छत्तीसगड सरकारने ४० लाखांचे इनाम लावले होते.

आता हिडमा हा तेलंगणा, आंध्रप्रदेशातील जंगलात अगदी खोलवर लपून बसू लागला होता. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागणे मुश्कील बनले होते. शिवाय, हिडमा दिसतो तरी कसा हेही कुणाला माहीत नव्हते. जे शरण आले होते, त्यांच्याकडून हिडमाच्या रंगरूपाची माहिती घेतली जात होती. हिडमा हा बंदुका दुरुस्त करण्यात आणि त्यांची निर्मिती करण्यात मातब्बर मानला जात होता.

२०२५ हे वर्ष माओवाद्यांसाठी अत्यंत घातक ठरले. अनेक वरिष्ठ नेते मारले गेले किंवा आत्मसमर्पण केले. सर्वात महत्त्वाचा पॉलिट ब्यूरो नेता म्हणजे जनरल सेक्रेटरी नमबाला केशव राव मारला गेला, तर मल्लुजोला वेंगुपाल राव उर्फ सोनू याने आत्मसमर्पण केले. यावर्षी निष्क्रिय झालेल्या केंद्रीय समिती सदस्यांत कादरी सत्यनारायण रेड्डी, कट्टा रामचंद्र रेड्डी, चलपति, गजराला रवि, विवेक चंद्र यादव आणि थेन्तू लक्ष्मी यांचा समावेश आहे.

भारताच्या सर्वांत भीषण माओवादी कमांडरांपैकी एक असलेल्या मडवी हिडमाच्या खात्म्याने देशातील वामपंथी उग्रवादाचा अंत आता जवळ आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ ही नक्षलवादाच्या अंताची अखेरची तारीख मुक्रर केली आहे. त्यानुसार सगळे नियोजनानुसार सुरू आहे. त्या परिस्थितीत हिडमाचा खात्मा ही ही माओवाद्यांसाठी मृत्युघंटा आहे. मे महिन्यात नंबाला केशव राव उर्फ बसवराज यांच्या झालेल्या मृत्यूच्या आणि ऑक्टोबरमध्ये मल्लोजुला वेंगुपाल राव तथा भूपतीच्या आत्मसमर्पणाच्या लगेच पाठोपाठच ही घटना घडली.
भारतामध्ये वामपंथी उग्रवाद (LWE) कमकुवत होण्याची प्रक्रिया २०२१ मध्ये मिलिंद तेलतुम्बडे याच्या खात्म्यापासून सुरू झाली. “नक्सलमुक्त भारत” करण्याचा संकल्प केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सलग तीव्र कारवाया राबवण्यात आल्या.

सीपीआय (माओवादी) संघटनेत हिडमाच्या खात्म्यामुळे नेतृत्वाचे मोठा संकट निर्माण झाले आहे. बसवराज याच्या मृत्यूनंतर ही फूट अधिक प्रकर्षाने वाढली आणि १४ ऑक्टोबर रोजी भूपतीने महाराष्ट्रातील गडचिरोली येथे सुमारे ६० कॅडरसह आत्मसमर्पण केले, त्यानंतर माओवादी संघटना खिळखिळी होत चालल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

डिसेंबरमध्ये सामान्य नागरिकांना मिळू शकतो दिलासा

सम्राट चौधरी, विजय सिन्हाचं राहणार बिहारचे उपमुख्यमंत्री!

हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद फाशीच्या शिक्षेवर काय म्हणाले?

आंध्र प्रदेशात ‘टेक’ शंकरसह सात नक्षलवादी ठार

भूपती हा या संघटनेतील मुख्य विचारवंत मानला जातो, याने सशस्त्र लढ्याला तात्पुरता विराम देण्याची मागणी केली होती. चौकशीत त्याने संघटनेतील अंतर्गत तणाव, जनाधार कमी होणे आणि तेलंगणातील काही माओवादी गटांचे स्थानिक राजकारण्यांशी असलेले व्यवहार याबाबत जाहीर वाच्यता केली. भूपतीच्या प्रस्तावाला कट्टर गटाने विरोध केल्यानंतर हिडमा आणि त्याच्या काही निष्ठावंत साथीदारांनी उरलेल्या सैन्य दलांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

आता मोठ्या संख्येने माओवादी मरण्याच्या भीतीने नव्हे, तर अशक्य असलेल्या क्रांतीने निर्माण झालेल्या भ्रमनिरासामुळे आत्मसमर्पण करत आहेत. हिडमाचा निकटचा सहकारी ओयाम लाख्मू, जो PLGA बटालियन क्रमांक १ चा सदस्य होता आणि ऑक्टोबरमध्ये आत्मसमर्पण केले. त्यानंतर हिडमा घाबरला आणि त्याने छत्तीसगड सीमेवरील तुलनेने कमजोर अशा ठिकाणी आसरा घेतला. तेथेच मंगळवारी सुरक्षा दलांनी त्याला घेरून मारले.

हिडमाने भलेही शरणागतीसाठी प्रयत्न केले असतील पण त्याने केलेली पापे त्याला जीवनदान देऊ शकत नव्हती.
छत्तीसगडमध्ये त्याने तब्बल २६ अत्यंत तीव्र असे हल्ले केले. त्यात व्ही. सी. शुक्ला यांच्यासह काँग्रेसचे अख्खे कॅडर त्याने मारले. एवढे होऊनही आता हिडमाच्या मृत्यूनंतर काँग्रेसने या कारवाईचे स्वागत केलेले नाही, हे विशेष. त्यानंतर हिडमाने २०१०च्या दंतेवाडा हत्याकांडात ७६ CRPF जवानांना मारले. २०२१ सुकमा–बीजापूर हल्ल्यात २२ जवान शहीद झाले. पण २०२५ मध्ये CRPF च्या COBRA कमांडोंनी केलेल्या कारवायांतून वरिष्ठ नेतृत्वाचा सर्वनाश झाला असून, २०२५ या एका वर्षात १३०० पेक्षा अधिक माओवादी आत्मसमर्पण केले आहेत. हिडमाची कहाणी आता संपली आहे. नक्षलवादाच्या अंताच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे असे मानले जात आहे. प्रतीक्षा आहे ती ३१ मार्च २०२६ची.

Exit mobile version