फिटनेसवर प्रश्नचिन्ह, पण विश्वास कायम; टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

फिटनेसवर प्रश्नचिन्ह, पण विश्वास कायम; टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

टी२० विश्वचषक २०२६ साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्श यांच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय प्रारंभिक संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे दुखापतीशी झुंज देत असलेले टिम डेव्हिड, जोश हेजलवूड तसेच एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.

विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला काही प्रमुख खेळाडूंच्या फिटनेसची चिंता आहे. टिम डेव्हिड बिग बॅश लीगदरम्यान जखमी झाला होता, तर जोश हेजलवूड एडीच्या दुखापतीने त्रस्त आहे. पॅट कमिन्सही पाठीच्या दुखापतीचा धोका टाळण्यासाठी काही काळ क्रिकेटपासून दूर आहे. मात्र तरीही निवड समितीने या तिघांवर विश्वास दाखवत त्यांना प्रारंभिक संघात संधी दिली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी सांगितले की, विश्वचषक सुरू होण्यापूर्वी हे सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होतील, असा संघ व्यवस्थापनाला विश्वास आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संघाची ताकद आणि खोली वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही केवळ प्रारंभिक संघनिवड असून अंतिम संघ जाहीर करण्यापूर्वी परिस्थितीनुसार बदल केले जाऊ शकतात, असेही बेली यांनी स्पष्ट केले.

टी२० विश्वचषक २०२६चे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. या देशांतील खेळपट्ट्या फिरकीला पोषक असल्याने ऑस्ट्रेलियाने संघात एडम झाम्पा आणि मॅथ्यू कुहनेमन या दोन तज्ज्ञ फिरकीपटूंना स्थान दिले आहे.

याशिवाय मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरन ग्रीन आणि युवा कूपर कॉनली यांसारखे अनुभवी तसेच तरुण अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. जोश इंग्लिसला संघातील एकमेव यष्टिरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.

विश्वचषकाची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होणार असून ऑस्ट्रेलियाचा संघ ‘ब’ गटात श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि ओमान यांच्यासोबत आहे.

ऑस्ट्रेलियाचा प्रारंभिक संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनली, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमरन ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, एडम झाम्पा.

Exit mobile version