मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील बायो-रिमेडिएशन अंतिम टप्प्यात; ६० एकर जमीन होणार पुनर्प्राप्त

मुंबई महापालिकेने ७० लाख टन जुन्या कचऱ्यापैकी ८५ टक्के कचऱ्याची लावली विल्हेवाट

मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील बायो-रिमेडिएशन अंतिम टप्प्यात; ६० एकर जमीन होणार पुनर्प्राप्त

मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राउंड येथे सुरू असलेला बायो-रिमेडिएशन (जैविक उपचार) प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, सुमारे ७० लाख टन जुन्या कचऱ्यापैकी जवळपास ८५ टक्के कचऱ्याची प्रक्रिया काम पूर्ण झाली असून डिसेंबर २०२६ पर्यंत या ठिकाणची सुमारे ६० एकर जमीन पुन्हा वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पाची मुदत अनेक वेळा वाढवावी लागली. ऑक्टोबर २०१८ मध्ये बीएमसीने ७३१ कोटी रुपयांच्या खर्चाने या डम्पिंग ग्राउंडची बायो-मायनिंग तंत्रज्ञानाद्वारे साफसफाई करण्याचे कंत्राट दिले होते. मात्र, कोविड-19 महामारी, प्रशासकीय मंजुरींमधील विलंब आणि अलीकडील आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे या कामावर परिणाम झाला. महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील ५५ लाख टनांहून अधिक कचऱ्याचे प्रक्रिया काम पूर्ण झाले आहे. यासाठी दररोज १०,००० ते १२,००० टन कचऱ्याच्या प्रक्रियेच्या क्षमतेने काम करण्यात आले.

मात्र अलीकडेच आखाती प्रदेशातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा या प्रकल्पावर परिणाम झाला. जड यंत्रसामग्री चालवण्यासाठी आवश्यक इंधनाच्या कमतरतेमुळे बायो-मायनिंग आणि कचरा प्रक्रिया कामाचा वेग काही प्रमाणात मंदावला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “कंत्राटदाराला यापूर्वीच चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे आणखी मुदतवाढ देण्याचा विचार केला जाणार नाही. उर्वरित १५ टक्के काम येत्या काही दिवसांत पूर्ण होईल आणि यावर्षी सुमारे ६० एकर जमीन पुनर्प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.”

मुंबईत दररोज सुमारे ७,००० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे ९० टक्के कचऱ्यावर कांजुरमार्ग प्रोसेसिंग प्लांट येथे प्रक्रिया केली जाते, तर उर्वरित १० टक्के कचरा अद्याप देवनार डम्पिंग ग्राउंड येथे टाकला जातो. २४ हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेले मुलुंड डम्पिंग ग्राउंड १९६८ पासून कार्यरत होते आणि एकेकाळी ते मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे लँडफिल साइट मानले जात होते. २०१८ मध्ये हे अधिकृतपणे बंद करण्यात आले. त्यानंतर पर्यावरणपूरक बायो-मायनिंग तंत्रज्ञानाद्वारे जुना कचरा हटवून जमीन पुनर्प्राप्त करण्याची योजना सुरू करण्यात आली.

हे ही वाचा:

पुनर्वसनाबाबत अनिश्चितता; दिल्ली जिमखाना क्लबची सरकारकडे ‘ही’ विनंती

जम्मू- काश्मीरमधील ११६ अमली पदार्थ तस्करांचे पासपोर्ट होणार रद्द

मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून आर्थिक वर्षात ७५.१५ दशलक्ष टन मालवाहतूकीची हाताळणी

पेट्रोल २.६१ रुपयांनी महागले तर, डिझेल २.७१ रुपयांनी झाले महाग

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईतील दोन प्रमुख जुनी डम्पिंग स्थळे – मुलुंड आणि देवनार – येथे सध्या जैविक उपचाराचे काम सुरू आहे. मुलुंड प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना, देवनार डम्पिंग ग्राउंडवरील सुमारे १८५ टन कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी बीएमसीने ‘लेटर ऑफ अ‍ॅक्सेप्टन्स’ही जारी केले आहे. महापालिकेच्या मते, हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ पर्यावरणावरील ताण कमी होणार नाही, तर शहरात अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्याने भविष्यातील शहरी विकास आणि नियोजनालाही मोठी चालना मिळणार आहे.

Exit mobile version