भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने पाकिस्तानी क्रिकेटपटू हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी केलेल्या चिथावणीखोर हावभावांबद्दल आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयने त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ व्हिडिओ पुरावे देखील सादर केले आहेत.
गेल्या रविवारी झालेल्या आशिया कप सुपर ४ सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी केलेल्या चिथावणीखोर हावभावांबद्दल भारताने आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. बीसीसीआयने बुधवारी या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जर साहिबजादा आणि रौफ यांनी हे आरोप लेखी स्वरूपात नाकारले तर आयसीसीची सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. त्यांना आयसीसी एलिट पॅनेल रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर राहावे लागू शकते.
मैदानावर असलेल्या भारतीय प्रेक्षकांकडून सतत येणाऱ्या “कोहली, कोहली”च्या घोषणांना प्रतिसाद म्हणून रौफ याने अनेक हातवारे केले. काही वेळा त्याने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना आणि संजू सॅमसनची विकेट घेताना लढाऊ विमानाची नक्कल केली आणि ‘६-०’ दाखवले. मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाची सहा विमाने पाडण्यात आली होती या खोट्या दाव्याशी जोडलेली ही प्रचाराची कृती आहे. यापूर्वी याच सामन्यादरम्यान, पाकिस्तानचा सलामीवीर फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर बंदुकीचा इशारा केला होता.
रौफने भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या भागीदारीदरम्यान त्यांच्याशीही वाद घातला आणि बीसीसीआयने त्यावरही तीव्र आक्षेप घेतला. या अहवालात असेही म्हटले आहे की, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “मैदानावरील असे वर्तन खेळाच्या भावनेविरुद्ध आहे. आम्ही अँडी पायक्रॉफ्टकडे याबद्दल तक्रार केली आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. पायक्रॉफ्टकडे केवळ अधिकृत तक्रारच करण्यात आली नाही तर रौफ आणि साहिबजादा यांचे व्हिडिओ देखील ईमेलसोबत जोडले गेले आहेत.”
हे ही वाचा :
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या काश्मीरी तरुणाला अटक!
शबरीन बनली ‘सीता’, हिंदू तरुणाशी लग्न करत म्हणाली-‘मला हिंदू धर्म खूप आवडतो’
कोळ्यांचं ग्रामदैवत ‘देवी गोल्फामाता’ ; १२ व्या शतकात यादव राजानं स्थापन केलेलं प्राचीन मंदिर!
दुसरीकडे, पाकिस्तानने या हावभावांवर कोणतीही टिप्पणी करण्याचे टाळले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत घडलेल्या दोन घटनांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, “आमचे काम क्रिकेट खेळणे आहे; लोक त्यांना काय हवे ते विचारू शकतात. आम्ही आशिया कप जिंकण्यासाठी येथे आहोत. आम्ही पाकिस्तानच्या आशा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”
