मुंबईतील घरांच्या व्यवहारात मांसाहारी आणि शाकाहारी असा भेदभाव होत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ताडदेव परिसरातील एका रिअल इस्टेट एजंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही, तर केवळ शाकाहारी व्यक्तींनाच घर दिले जाईल, असे सांगितले जात असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये भावेश कावरे नावाचा इस्टेट एजंट ताडदेवमधील एका घराची माहिती देताना दिसत आहे. संबंधित घरासाठी ग्राहक मांसाहार करत असल्यास घर मिळणार नसल्याचे, तर शाकाहारी असल्यास घर मिळू शकते, असे तो सांगत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे घर भाड्याने किंवा खरेदीसाठी व्यक्तीची खाण्याची निवड हा निकष असू शकतो का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे ही वाचा:
झारखंडमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन २०व्या दिवशीही सुरू; मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव?
स्वच्छतेचा फज्जा, डॉमिनोजला झटका; सातारासह मुंबईतील चार आउटलेट्सचे परवाने रद्द
रेवण्णाच्या कोठडीतून जप्त केलेल्या फोनमध्ये ९० अश्लील व्हिडिओ
पाक गृहमंत्र्यांकडून हाफिज सईदचे गुणगान; भारताला धमकी
या व्हिडीओवर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मच्छी, मटण किंवा चिकन खाणाऱ्या व्यक्तीला केवळ त्याच्या खाद्यपद्धतीमुळे घर नाकारणे हा सामाजिक भेदभाव असल्याचा आरोप केला जात आहे. मुंबईसारख्या विविध संस्कृती आणि खाद्यपरंपरांचा संगम असलेल्या शहरात अशा प्रकारच्या अटी लावल्या जाण्यावरही सवाल उपस्थित होत आहेत. यापूर्वीही मुंबईतील घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवली यांसारख्या परिसरात मराठी भाषिक किंवा मांसाहारी नागरिकांना घर नाकारल्याच्या घटना चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे ताडदेवमधील या कथित प्रकारामुळे मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रातील खाद्यसंस्कृतीवर आधारित भेदभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
