राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)च्या सहावी इयत्तेसाठी नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या कन्नड भाषेच्या ‘कृष्ण’ या पाठ्यपुस्तकावरून कर्नाटकमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील एका शिक्षण हक्क संघटनेने या पुस्तकावर धार्मिक आणि सांस्कृतिक पक्षपाताचे आरोप करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, एनसीईआरटीने हे सर्व आरोप फेटाळून लावत पुस्तकाचे नाव भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित नसून कृष्णा नदीवरून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
‘पीपल्स अलायन्स फॉर द फंडामेंटल राईट टू एज्युकेशन’ (PAFRE) या संघटनेने पाठ्यपुस्तकातील काही बाबींवर आक्षेप घेतला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, पुस्तकात कर्नाटकच्या विविध सांस्कृतिक परंपरा, लोकजीवन आणि प्रादेशिक वैविध्याला पुरेसे स्थान देण्यात आलेले नाही. तसेच ‘कृष्ण’ हे नाव देण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
संघटनेने पुस्तकातील ‘संतुलित आहार’ या धड्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, कर्नाटकातील अनेक भागांमध्ये अंडी, मासे आणि मांसाहार हा दैनंदिन आहाराचा भाग आहे. मात्र, पुस्तकात त्याचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचा दावा करण्यात आला आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याला शाकाहाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
या आरोपांनंतर एनसीईआरटीने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले. परिषदेनुसार, भाषेच्या पाठ्यपुस्तकांना भारतातील प्रमुख नद्यांची नावे देण्याची परंपरा आहे. हिंदीच्या पुस्तकाला ‘गंगा’, इंग्रजीच्या पुस्तकाला ‘कावेरी’, उर्दूच्या पुस्तकाला ‘जमुना’ तर कन्नडच्या पुस्तकाला ‘कृष्ण’ हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या नावाचा कोणत्याही धार्मिक व्यक्तिमत्त्वाशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे एनसीईआरटीने स्पष्ट केले. एनसीईआरटीने पुढे म्हटले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ यांच्या अनुषंगाने स्थानिक संस्कृती, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवांशी जोडलेले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृष्णा नदी ही कर्नाटकातील महत्त्वाची नदी असल्यामुळे पुस्तकासाठी हे नाव निवडण्यात आले.
हे ही वाचा:
बांगलादेशी नागरिकांसाठी पुन्हा पर्यटन व्हिसा सेवा सुरू
बंगालमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याप्रकरणी स्थानिक नेत्याला अटक
“पत्रकारांविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्याचा हेतू नव्हता”
खासदार संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ
आहारासंदर्भातील वादावर उत्तर देताना एनसीईआरटीने सांगितले की, ‘हेल्थ इज वेल्थ’ या धड्यात संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगितले आहे. त्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थांचा संदर्भ देण्यात आला असून कोणत्याही विशिष्ट आहारपद्धतीचा प्रचार करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देणे हा या धड्याचा मुख्य उद्देश असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.
