राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवार, २८ जानेवारी रोजी अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त करत आपला मोठा भाऊ गेला आणि अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
“मनाला वेदना आणि चटका देणारी ही घटना आहे. अजित दादा इतक्या लवकर सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्त्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक अभ्यास करुन बोलण्याची सवय होती. चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी ते मनाने निर्मळ होते याचा अनुभव मीही घेतलेला आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा:
राज्याच्या राजकारणातील ‘दादा’ व्यक्तिमत्त्व हरपले! कशी होती राजकीय कारकीर्द?
“जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते अजित पवार”
चांदीला चढा भाव! २१,००० रुपयांची उसळी
बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलं. एकदा कोणतीही गोष्ट करायची ठरवली की ते करायचेच. आम्ही टीम म्हणून महाराष्ट्रासाठी काम केलं. अजित दादा सकाळी ६ वाजताही लोकांना भेटत असत. वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला आहे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. आज सकाळी जेव्हा घटना कळली तेव्हा परवाच्याच भेटीची दृश्य समोर येत होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबाचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन निघणारं नुकसान झालेलं आहे. एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
