‘धुरंधर’ ठरला नेटफ्लिक्सवर २०२६ मधील नंबर वन चित्रपट

नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारांडोस यांनी दिली माहिती

‘धुरंधर’ ठरला नेटफ्लिक्सवर २०२६ मधील नंबर वन चित्रपट

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारांडोस यांनी ‘धुरंधर’ हा २०२६ मधील जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला बिगर-इंग्रजी (नॉन-इंग्लिश) चित्रपट ठरल्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे, तर या चित्रपटाने यंदाच्या वर्षातील अनेक इंग्रजी चित्रपटांनाही लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टेड सारांडोस यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे कौतुक करताना सांगितले की, भारतीय कथा आता केवळ देशांतर्गत प्रेक्षकांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. जगभरातील प्रेक्षक भारतीय चित्रपटांना मोठा प्रतिसाद देत असून, ‘धुरंधर’ हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. भारतीय मनोरंजन उद्योगाने जागतिक पातळीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘धुरंधर’ने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. त्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यावरही चित्रपटाने प्रेक्षकांचा तितकाच मोठा प्रतिसाद मिळवला. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात तो अनेक देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या बिगर-इंग्रजी चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला होता.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर ‘धुरंधर’ने आशिया आणि मध्यपूर्वेतील अनेक देशांसह २२ देशांमध्ये ट्रेंडिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ७.६ दशलक्ष व्ह्यूज मिळवत नेटफ्लिक्सवरील भारतीय चित्रपटांसाठी नवा विक्रम प्रस्थापित केला होता.

हे ही वाचा:

आजी-आजोबांची हत्या करून विद्यार्थ्याकडून शाळेत गोळीबार; सात जणांचा मृत्यू

अंधेरीतील ईएसआयसी रुग्णालय कधी सुरू होणार? राजेश शर्मांची अवमान याचिका

छापखान्यातून नव्हे, प्रश्नपत्रिका तयार करतानाच फोडला नीटचा पेपर

सौदी अरेबिया-पाकिस्तान-तुर्कीची नवी संरक्षण आघाडी ‘इस्लामिक नाटो’?

‘धुरंधर’च्या या यशामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक ओटीटी विश्वात आणखी बळ मिळाले आहे. भारतीय कथा, कलाकार आणि निर्मितीमूल्यांना जगभरातून मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असल्याचे या विक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अशा यशामुळे भविष्यात भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version