३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्टसह पत्नीला सशर्त जामीन

सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्टसह पत्नीला सशर्त जामीन

चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेताम्बरी भट्ट यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात या दाम्पत्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच फसवणुकीची रक्कम शक्य तितक्या लवकर परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीने उदयपूर सत्र न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने काही अटी आणि निर्देशांसह दाम्पत्याला जामीन मंजूर केला. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी राजस्थान सरकारला नोटीस बजावली असून दाम्पत्याला जामीन बॉण्डवर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, तपासात पूर्ण सहकार्य करणे, तपासादरम्यान दिल्लीमध्येच वास्तव्यास राहणे आणि पासपोर्ट पोलिसांकडे जमा करणे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

दरम्यान, विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीने चित्रपट गुंतवणुकीनंतर मोठी रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही चित्रपटांचे चित्रीकरण झाल्यानंतर त्यांनी पैसे परत करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुर्डिया यांची विक्रम भट्ट यांच्याशी भेट झाली होती. ते आपल्या पत्नीच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करू इच्छित होते. दोघांमध्ये चार चित्रपट निर्मितीचा करार झाला होता आणि अजय मुर्डिया यांनी ४४.२९ कोटी रुपये गुंतवणूक म्हणून दिले होते. मात्र काही चित्रपटांच्या चित्रीकरणानंतर प्रकरण थंडावले. पैसे परत मागितल्यानंतर विक्रम भट्ट टाळाटाळ करू लागल्याने कंपनीच्या संस्थापकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.

हे ही वाचा:

आता पंतप्रधान कार्यालय नाही, सेवा तीर्थ…

अमेरिकेचा सर्वात मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना

सोने व चांदीच्या किंमतीत थोडी वाढ

AI च्या वाढत्या प्रभावाचा बाजाराला फटका

यापूर्वी विक्रम भट्ट यांनी उदयपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. याशिवाय विक्रम भट्ट यांच्यावर १३.५ कोटी रुपयांच्या आणखी एका फसवणुकीचा गुन्हाही दाखल असून तो चित्रपट गुंतवणुकीशी संबंधित आहे. या प्रकरणात २४ जानेवारी रोजी एका व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Exit mobile version