सीमा सडक संघटना (बीआरओ) च्या प्रोजेक्ट हिमांकने गुरुवारी लेह येथील मुख्यालयात आपला ४१ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. ४ डिसेंबर १९८५ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प लडाखच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये रस्ते बांधण्याचा आणि ते कायम वाहतुकीसाठी खुले ठेवण्याचा समानार्थी बनला आहे. लोक प्रेमाने त्यांना “माउंटन टेमर्स” असे नाव देतात. समुद्रसपाटीपासून ११ हजार ते १९ हजार ५०० फूट उंचीवर काम करणारा हा प्रकल्प भारतीय सैन्याची ताकद आणि दुर्गम गावांच्या विकासाचा आधारस्तंभ ठरला आहे.
मागील वर्षभरात प्रोजेक्ट हिमांकनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १६१ किलोमीटर लांबीचे ४ नवे रस्ते पूर्ण केले आणि ९४१ मीटर लांबीचे २२ मोठे पूल उभारले. या रस्त्यांमुळे आणि पुलांमुळे हानले, चुमार, डेमचोक, हॉट स्प्रिंग आणि दाऊलत बेग ओल्डी यांसारख्या संवेदनशील सीमावर्ती भागांपर्यंत आता वर्षभर सहज पोहोचता येते. त्यामुळे सैन्याचे ताफे आणि सामान्य नागरिक दोघांचाही प्रवास जलद झाला आहे. प्रोजेक्ट हिमांक केवळ रस्तेच नव्हे तर मानवी मदतही पुरवते. उंच दर्र्यांवर वैद्यकीय आणि दंत शिबिरे घेतली जातात. उमलिंग ला, खारदुंग ला, चांग ला आणि तांगलांग ला येथे बीआरओ कॅफे आणि ऑक्सिजन सपोर्ट सेंटर सुरू केले असून, याचा पर्यटक आणि स्थानिकांना मोठा फायदा होतो. पूर, भूस्खलन किंवा रस्ते वाहून गेल्यास हिमांकच्या टीम सर्वांत आधी घटनास्थळी पोहोचते आणि काही तासांत मार्ग पुन्हा खुला करते.
हेही वाचा..
माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचे निधन
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात
‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम
लडाखची जीवनरेखा असणारे लेह विमानतळ हिवाळ्यात खुलं ठेवणं सर्वात मोठं आव्हान असतं. हिमांकच्या टीम रात्री २ वाजल्यापासून बर्फ हटवण्याचे काम सुरू करतात, जेणेकरून सकाळची पहिली उड्डाण वेळेवर उतरू शकेल. राष्ट्रीय महामार्ग –३ आणि डीबीओ, गलवान, हॉट स्प्रिंग व हानले यांसारख्या अग्रिम पोस्टपर्यंत जाणारे मार्ग वर्षभर बर्फमुक्त ठेवले जातात. कामगारांच्या सुरक्षेची आणि आरोग्याचीही काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी इन्सुलेटेड शेल्टर, गरम पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि उत्कृष्ट हिवाळी कपडे पुरवले जातात. त्यामुळे कठोर थंडी आणि उंची असूनही कामगार सुरक्षितपणे काम करू शकतात.
आपल्या ४१ व्या स्थापना दिनी, प्रोजेक्ट हिमांकने पुन्हा एकदा वचन दिलं की, त्याच समर्पणाने आणि वेगाने ते देशाच्या सीमांना अधिक बळकट करीत राहील आणि लडाखवासीयांचे जीवन अधिक सुलभ करील. लेहमध्ये झालेल्या या भव्य कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान स्पष्ट जाणवत होता.
