गणपतीपुळ्यात समुद्राचा घाला; संभाजीनगरच्या पाच तरुणांचा मृत्यू

गणपतीपुळ्यात समुद्राचा घाला; संभाजीनगरच्या पाच तरुणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच तरुणांचा मृत्यू झाला. समुद्रातील प्रबळ प्रवाह आणि उसळणाऱ्या लाटांमुळे आठ जण पाण्यात अडकले होते. त्यापैकी तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले, तर पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरातील १९ तरुणांचा गट पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान काही तरुण समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील लाटांचा वेग आणि पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने आठ जण समुद्राच्या प्रवाहात अडकले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक, जीवरक्षक, मच्छीमार, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर तिघा तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, पाच जणांचा जीव वाचवता आला नाही.

मृतांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा समावेश आहे. सर्वजण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरातील रहिवासी असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती, जोरदार लाटा आणि प्रबळ करंटमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. तरीही प्रशासनाने युद्धपातळीवर मोहीम राबवून शोध आणि बचावकार्य पूर्ण केले.

या दुर्घटनेची बातमी बिडकीन परिसरात पोहोचताच शोककळा पसरली. पर्यटनासाठी आनंदाने निघालेल्या मित्रांच्या सहलीचा शेवट अशा दुर्दैवी घटनेत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील धोकादायक प्रवाह, भरती-ओहोटी आणि बदलत्या हवामानामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासन आणि जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मृत तरुणांची नावे

बचावकार्याची ठळक माहिती

पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर खबरदारी आवश्यक

पावसाळ्यात समुद्रातील प्रवाह अचानक बदलतात. अनेक ठिकाणी रिप करंट, खोल खड्डे आणि जोरदार लाटा निर्माण होतात. त्यामुळे लाल ध्वज असलेल्या किंवा धोकादायक घोषित केलेल्या भागात समुद्रात उतरणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version