फिफा विश्वचषक २०२६ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध मोरोक्कोने मिळवलेल्या १-० च्या महत्त्वपूर्ण विजयाचा आनंद अभिनेत्री नोरा फतेही हिने अनोख्या पद्धतीने साजरा केला. विशेष म्हणजे सामन्यापूर्वी केलेली तिची १-० विजयाची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याने तिचा आनंद द्विगुणित झाला.
मोरोक्कोमध्ये जन्मलेल्या नोरा फतेहीने बोस्टन स्टेडियममधून सामना पाहताना इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. सामन्यापूर्वी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती, “मी मोरोक्को विरुद्ध स्कॉटलंड सामना पाहण्यासाठी बोस्टनमध्ये आहे आणि माझी भविष्यवाणी १-० अशी आहे,” असे म्हणताना दिसली होती.
नोराने आणखी एका व्हिडिओत २८ वर्षांपूर्वीच्या मोरोक्को-स्कॉटलंड सामन्याची आठवण करून दिली. त्या वेळी मोरोक्कोने स्कॉटलंडचा ३-० असा पराभव केला होता. यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होईल का, असा सवाल तिने चाहत्यांना केला होता.
सामन्याच्या सुरुवातीलाच मोरोक्कोने अवघ्या ७० सेकंदांत गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात स्कॉटलंडच्या बचावफळीवर दबाव कायम ठेवत मोरोक्कोने विजय निश्चित केला. गोल झाल्यानंतर स्टँडमध्ये उपस्थित असलेली नोरा जल्लोष करताना दिसली.
या विजयामुळे मोरोक्कोने गट ‘अ’ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवत ६ गुणांसह बाद फेरीकडे भक्कम पाऊल टाकले आहे. यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नोरा मोरोक्कोला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होती.







