शशी थरूर म्हणाले, महादेवाच्या भाळावरील चंद्रकोरीवरून ‘शशी’ नाव ठेवले!

महाशिवरात्रीनिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा 

शशी थरूर म्हणाले, महादेवाच्या भाळावरील चंद्रकोरीवरून ‘शशी’ नाव ठेवले!

महाशिवरात्रीनिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण असून शिवभक्तांकडून महादेवाची पूजा केली जात आहे. सकाळपासूनच महादेवांच्या मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा दिसून आल्या आहेत. याच दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही आज (२६ फेब्रुवारी) महाशिवरात्रीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. शशी थरूर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, महाशिवरात्रीचा दिवस त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप खास आहे. दरम्यान, शशी थरूर यांनी दिलेल्या शुभेच्छाची सर्वत्र ठिकाणी चर्चा होत आहे.

शशी थरूर यांनी शंकर महादेवाचा फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले, माझा जन्म महाशिवरात्रीला झाला आणि त्यामुळेच माझे नाव महादेवाच्या भाळावर असलेल्या चंद्रकोरीवरून ‘शशी’ असे ठेवण्यात आले. केरळच्या कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा माझा जन्मदिन आहे. माझ्या कुटुंबियांसाठी हा अनोखा दिवस आहे, असे शशी थरूर म्हणाले.

काँग्रेस पक्षाबरोबर मतभेद सुरु असताना शशी थरूर यांच्या महाशिवरात्रीच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शशी थरूर यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतचा एक फोटो नुकताच सोशल मिडीयावर शेअर करत भेटून आनंद झाल्याचे म्हटले होते. फोटोमध्ये त्यांच्यासोबत ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स देखील सोबत होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवरही शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्यामुळे मात्र पक्षाने आक्षेप घेतला होता. पक्षाने यावर आक्षेप घेतला तेव्हा शशी थरूर म्हणाले की त्यांनी राज्य आणि देशाच्या हितासाठी हे विधान केले होते. शशी थरूर यांनी एका संभाषणादरम्यान सांगितले की, ‘मी काँग्रेसमध्ये आहे, पण जर पक्षाला माझी गरज नसेल तर माझ्याकडेही पर्याय आहेत.

हे ही वाचा : 

राहुल गांधी, उद्धव ठाकरे महाकुंभला गेले नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार टाका!

महाकुंभ मेळ्याच्या समारोप संध्येला प्रयागराजमध्ये सुखोई विमानांकडून कसरती

महाशिवरात्रीनिमित्त झेंडे, लाऊडस्पीकर लावण्यास विरोध; मदरशामधून दगडफेक

वैभव गोळे ज्युनियर मुंबई श्रीचा विजेता

दरम्यान,  पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्याची शशी थरूर यांची ही पहिलीच घटना नाही. एप्रिल २०२३ मध्ये, शशी थरूर यांनी केरळसाठी वंदे भारतच्या घोषणेचे कौतुक केले होते आणि जुलै २०२३ मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, मुस्लिम देशांशी आपले संबंध आता इतके चांगले कधीच नव्हते. आंतरराष्ट्रीय योग दिनीही थरूर यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. ‘जी-२०’ ला चर्चेचा विषय बनवल्याबद्दल थरूर यांनी मोदींचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की भारताने जी-२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. जग आता भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

Exit mobile version