विवाहानंतर जोडप्याचे विमान अपघातग्रस्त, भारतीय वंशाच्या डेव्हचा मृत्यू, पण पत्नी वाचली!

विवाहानंतर जोडप्याचे विमान अपघातग्रस्त, भारतीय वंशाच्या डेव्हचा मृत्यू, पण पत्नी वाचली!

अमेरिकेतील वृत्तमाध्यमांच्या अहवालानुसार, नुकतेच लग्न झालेल्या भारतीय वंशाच्या डेव्ह फिजीचा जॉर्जिया येथे हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींमध्ये समावेश होता. डेव्ह आणि जेस्नी या जोडप्याचे लग्न त्याच दिवशी डॉसनव्हिलजवळील द रेवेरे येथे झाले होते. तिथून ते विमानाने रवाना झाले पण ते विमान अपघातग्रस्त झाले.

अटलांटा येथील रहिवासी  डेव्ह फिजी हा डेल्टा एअर लाइन्सचा वैमानिक होता. २५ वर्षीय डेव्हचा शुक्रवारी डॉसन काउंटीतील डॉसनव्हिलजवळ पाच आसनांच्या रॉबिन्सन हेलिकॉप्टर कोसळल्याने मृत्यू झाला. पण त्याची पत्नी जेस्नी ही सुदैवी ठरली. ती या अपघातात आश्चर्यकारकरित्या बचावली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.  जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरचा वैमानिकही या अपघातात मृत्युमुखी पडला.

हे ही वाचा:

पहलगाम हल्ल्याआधीच सक्रिय झाले फोन; पाकिस्तानी बँकेचे कनेक्शन

वैभव सूर्यवंशी ठरला वैभवशाली क्रिकेटपटू, पुरस्कारातून ४५ लाखांची कमाई

विझिंजम बंदराचा विक्रम; १८ महिन्यांत २० लाख TEU माल हाताळला

बंगालच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ३५ मंत्र्यांनी घेतली शपथ

डेव्हचे पालक जॉर्ज आणि फेबा फिजी हे अनेक वर्षांपूर्वी केरळमधील मुवत्तूपुझा येथून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. जेस्नीच्या कुटुंबाची मुळेही केरळमधील अलापुझा जिल्ह्यात आहेत. डेव्हचे कुटुंबीय या अपघाताने पुरते खचून गेले आहे. डेव्हचे वडील जॉर्ज म्हणाले की, “तो आमच्यासाठी खूप मौल्यवान मुलगा होता, तो देवाची देणगी होता… खूप देखणा, सुंदर. आम्ही म्हणू शकतो की ते परिपूर्ण लग्न होते. आम्हाला आणखी काहीच नको होते.

नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळावरून निघून पीचट्री डिकाल्ब एअरपोर्ट  येथे जाणार होते आणि त्यानंतर अटलांटा शहरातील एका हॉटेलमध्ये रात्र घालवणार होते. परंतु स्वागत समारंभ संपेपर्यंत हवामान बिघडले होते.

जॉर्ज फिजी यांनी सांगितले की, समारंभ रात्री सुमारे ९:३० वाजता संपला आणि धुके व पावसामुळे दृश्यमानता खूप कमी झाली होती. अनुभवी व्यावसायिक वैमानिक असलेल्या डेव्ह याने अशा परिस्थितीत उड्डाण करण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. “तो म्हणाला होता की, या दृश्यमानतेमध्ये मी उड्डाण केले नसते. पण या चिंतेनंतरही, हेलिकॉप्टरच्या वैमानिकाने अधिक उंचीवरून उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. नंतर हे हेलिकॉप्टर डॉसनव्हिलच्या नैऋत्य दिशेला असलेल्या डोंगराळ, दाट जंगल असलेल्या भागात कोसळले.

जॉर्ज फिजी यांच्या मते, जेस्नी जवळपास पाच तास ढिगाऱ्याखाली आणि पडलेल्या झाडांखाली अडकून राहिली, त्यानंतर बचाव पथक तिच्यापर्यंत पोहोचले. ती म्हणाली की, शुद्धीवर आल्यावर ती ढिगाऱ्याखाली होती. डेव्ह तिच्या छातीवर पडलेला होता. ती स्वतः एक परिचारिका (नर्स) आहे. तिने त्याला स्पर्श करून हाक मारली, पण तोपर्यंत त्याचे शरीर थंड झाले होते.

जेस्नीला अनेक ठिकाणी जखमा आणि खरचटले होते.  परंतु तिचे कोणतेही हाड मोडले नाही. ती आश्चर्यकारकरित्या बचावली. मात्र डेव्ह यांच्या मृत्यूमुळे ती पूर्णपणे खचून गेली आहे, असे जॉर्ज फिजी यांनी सांगितले.

अपघातस्थळाजवळ राहणाऱ्या एका रहिवाशाने सांगितले की, बचावकार्य अत्यंत कठीण भूभागात करण्यात आले. जिवंत बचावलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सहा तास लागले,” असे तो म्हणाला. बचाव पथकाला ऑफ-रोड वाहनांचा वापर करावा लागला आणि दाट झाडी कापून मार्ग तयार करावा लागला.

हेलिकॉप्टरची मालकी असलेल्या प्रेस्टिज हेलिकॉप्टर्सचे ऑपरेशन्स संचालक अँडी व्हिटेकर यांनी या अपघातामुळे धक्का बसल्याचे सांगितले पण ते म्हणाले की, कंपनीचा गेल्या ४० वर्षांचा इतिहास चांगला आहे आणि वैमानिकाला हा मार्ग चांगला परिचित होता.

Exit mobile version