स्वातंत्र्य दिन २०२५: निमंत्रण पत्रिकांवर ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो आणि ‘चिनाब पुला’ची झलक!

संरक्षण मंत्रालयाने दिली माहिती 

स्वातंत्र्य दिन २०२५: निमंत्रण पत्रिकांवर ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो आणि ‘चिनाब पुला’ची झलक!

१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय राजधानीत होणाऱ्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी पाहुण्यांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकांवर भारताच्या निर्णायक लष्करी ऑपरेशन ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो आणि चिनाब पुलाचे चित्र छापण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ला संकुलात स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाचे नेतृत्व करतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश देखील या प्रसंगी साजरे केले जाईल.

संरक्षण मंत्रालयाने बुधवारी (१३ ऑगस्ट) एका निवेदनात म्हटले आहे की, “ऑपरेशन सिंदूरचे यश या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात साजरे केले जाईल. लाल किल्ला संकुलातील ज्ञानपथावर बसवलेल्या ‘व्ह्यू कटर’वर ऑपरेशन सिंदूरचा लोगो प्रदर्शित केला जाईल.” पुढे म्हटले आहे की, “ऑपरेशन सिंदूरचा लोगो निमंत्रण पत्रिकांवर देखील छापलेला आहे. यासोबतच, त्यावर चिनाब पुलाच्या आकाराची प्रतिमा देखील छापलेली आहे, जी ‘नव्या भारता’च्या उदयाचे प्रतीक आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाम हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून ७ मे रोजी सकाळी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिका इंग्रजी आणि हिंदीमध्ये जारी करण्यात आल्या आहेत. निमंत्रण पत्रिकांवर वरच्या उजव्या कोपऱ्यात ऑपरेशन सिंदूरचा लोगो आहे तर जगातील सर्वात उंच चिनाब पुलाची प्रतिमा निमंत्रण पत्रिकांच्या तळाशी आहे. ही निमंत्रण पत्रिका प्रामुख्याने संरक्षण मंत्रालयाच्या निमंत्रण वेबसाइटद्वारे ऑनलाइन जारी केली जात आहेत. 

हे ही वाचा : 

पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान अंदाधुंद गोळीबार, ३ जणांचा मृत्यू!

३५ लाख रुपयांचे बक्षीस असलेले दोन नक्षली ठार!

‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’मुळे कुणाला फुटला कंठ ?

एंटेलिया खाली पुन्हा स्फोटके…

दरम्यान, दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सुरक्षा तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला.  स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीतही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसंदर्भात दिल्ली पोलिस आयुक्त एस. बी. के. सिंह यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

Exit mobile version