भारत-पाकिस्तानमधील राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून ‘जशास तसं’ कारवाई सुरू असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाबाहेरील सुरक्षा बॅरिकेड्स आणि इतर अडथळे हटवल्यानंतर अवघ्या काही दिवसांत भारतानेही नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाबाहेरील बॅरिकेड्स, ट्रॅफिक बोलार्ड्स आणि इतर संरचना हटवल्या आहेत.
दिल्लीतील अधिकाऱ्यांनी यंत्रांच्या मदतीने पाकिस्तान उच्चायोगाबाहेरील बाह्य सुरक्षा संरचना हटवल्या. यामध्ये वाहतूक नियंत्रित करण्यासाठी उभारण्यात आलेले बोलार्ड्स, बॅरिकेड्स तसेच व्हिसा विभागाजवळील रांगेचे व्यवस्थापन करण्यासाठी केलेल्या काही संरचनांचाही समावेश आहे. अधिकृत मंजुरीच्या हद्दीबाहेर काही संरचना उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या कारवाईनंतर उच्चायोगाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी संरचना, रेलिंग, पत्रे आणि बांधकाम साहित्याचा मलबा दिसून आला. मात्र, पाकिस्तान उच्चायोगाची मुख्य इमारत आणि मुख्य प्रवेशद्वार कायम ठेवण्यात आले आहे.
याआधी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाबाहेरील सुरक्षा व्यवस्था आणि बॅरिकेड्स हटवले होते. त्यानंतर भारताकडून दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाबाहेरील सुरक्षा संरचनांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई दोन्ही देशांमधील ‘टिट-फॉर-टॅट’ म्हणजेच जशास तसं उत्तर म्हणून पाहिली जात आहे.
हे ही वाचा:
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ‘आयपीओ’ला सेबीचा ग्रीन सिग्नल!
सकाळी १० वाजले तरी ऑफिस रिकामं! बंगळुरूच्या ट्रॅफिकला कंपन्या हैराण
जेन झीला आकर्षित करण्यासाठी सरकारी बँकांनी ‘कूल’ व्हावे
भारतीय कार बाजाराला वेग! FY31 पर्यंत ६३ लाख वाहनांची विक्री शक्य
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आधीपासूनच तणावपूर्ण आहेत. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक पातळीवरही विविध निर्बंध आणि प्रतिकारात्मक पावले उचलली जात आहेत.
