इंडिगो विमानात प्रवाशाची प्रकृती बिघडली

जयपूरमध्ये मेडिकल इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो विमानात प्रवाशाची प्रकृती बिघडली

सूरतहून जयपूरकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडल्याने विमानाचे जयपूर विमानतळावर मेडिकल इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. इंडिगोच्या ६ई-६८५२ या विमानात ही घटना घडली. प्रवाशाची प्रकृती अचानक खालावल्याने विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारानंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने विमान जयपूरमध्ये उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजून ३६ मिनिटांनी विमानाचे जयपूर विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान उतरल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या वैद्यकीय पथकाने संबंधित प्रवाशाला तातडीने ताब्यात घेतले आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या प्रवाशावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
महुआ मोईत्रा यांच्या विरोधात अटक वॉरंट

‘बाबाजी, माझ्या तारुण्याची आणि बेडरूमची दिवास्वप्ने पाहू नका’

१८ दिवसांत साखर तब्बल १८ रुपयांनी महागली

‘जेन झी’ आहे म्हणत तरुणीने काश्मिरमध्ये सैनिकांशीच घातली हुज्जत

विमानातील एखाद्या प्रवाशाची प्रकृती गंभीर झाल्यास विमान कंपनीकडून मेडिकल इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला जातो. अशा परिस्थितीत सर्वप्रथम केबिन क्रू प्रवाशाची प्राथमिक तपासणी करतो. विमानात डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती असल्यास त्यांची मदत घेतली जाते. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यास वैमानिकाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती देऊन जवळच्या योग्य विमानतळावर प्राधान्याने लँडिंगची परवानगी घेतली जाते. त्याचवेळी विमानतळावर रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक सज्ज ठेवले जाते.

दरम्यान, यापूर्वी मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानालाही अशाच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे मुंबईत परतावे लागले होते. त्यामुळे विमानसेवांमध्ये प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तत्पर वैद्यकीय व्यवस्था किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Exit mobile version