…तर भारत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांना युद्ध मानणार! भारताचा अंतिम इशारा

मोदींच्या बैठकीनंतर भारताने पाकिस्तानला सुनावले

…तर भारत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांना युद्ध मानणार! भारताचा अंतिम इशारा

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून सीमेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानच्या या कुरापती कारवायांना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. याशिवाय गेल्या सलग दोन रात्री पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांचा प्रयत्न केला जात आहे. भारताने हे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. तरीही पाकिस्तानची मुजोरी कमी होत नसून आता भारताने पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे.

भारताने पाकिस्तानला अंतिम अल्टिमेटम देत स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानकडून होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई आता युद्ध मानली जाईल. तसेच त्यानुसार त्याला रोखठोक प्रत्युत्तर दिले जाईल. एएनआयने यासंदर्भात सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण प्रमुख (सीडीएस) आणि भारतीय सशस्त्र दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. शनिवारी पहाटे पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील चार हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर ही बैठक झाली.

सरकारच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, भारत आता यापुढे पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले सहन करणार नाही. जर पाकिस्तानने अजूनही दहशतवादी हल्ले थांबवले नाहीत तर भारत त्याला युद्ध मानेल आणि त्यानुसार त्याचा सामना करेल.

हे ही वाचा..

बातम्या देताना हवाई हल्ला सायरनच्या आवाजाचा वापर करू नका!

पाकिस्तानी ड्रोनचा टार्गेट होते निष्पाप नागरिक

पाकिस्तानचे अण्वस्त्रहरण; अण्वस्त्राबाबत बैठक बोलावल्याचे वृत्त खोटे

मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची घेतली माहिती

२२ एप्रिल रोजी, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची आघाडी संघटना टीआरएफने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले. भारतीय पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, ज्यामुळे देशभरात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला होता. पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या कारवाईने अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मूसह अनेक शहरांवर ४०० तुर्की ड्रोनने हल्ला केला. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने आकाशातच हे हल्ले उधळून लावले. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतातील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. हे देखील उधळून लावण्यात आले. पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. भारतानेही सहा पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले.

Exit mobile version