महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा शुक्रवारी निकाल लागला. पण प्रामुख्याने अवघ्या महाराष्ट्राचे ज्या पालिका निकालांकडे लक्ष होते त्या मुंबई महानगरपालिकेत मराठी माणसाने ठाकरे ब्रँडला अपेक्षित साथ दिली नाही. गेल्या सहा सात महिन्यांपासून ठाकरे ब्रँडची चर्चा इतक्या प्रमाणात करण्यात आली होती की, हा ब्रँड मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळवेल असाच जणू अंदाज व्यक्त करण्यात आला. पण संध्याकाळपर्यंत जे निकाल आणि कल हाती आले त्यानुसार शिवसेना उबाठाला ६० जागा मिळाल्या होत्या तर उद्धव ठाकरेंना साथ देणाऱ्या मनसेच्या पदरात मात्र अवघ्या ८-९ जागाच आल्या. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण तापवणाऱ्या ठाकरे बंधूंना मराठी जनतेने एकप्रकारे नाकारले, ठाकरे ब्रँड कोसळला असेच म्हणता येईल. मुंबईत प्रथमच भाजपाचा महापौर होणार यावर याच मराठी माणसाने शिक्कामोर्तब केले आहे. लेख लिहीत असताना ११८ जागी भाजपा शिवसेना महायुतीने यश मिळविले होते म्हणजे बहुमताचा आकडाही त्यांनी पार केला.
मुळात ठाकरेंच्या उबाठा शिवसेनेने मुंबईत लढविल्या होत्या १६७ जागा. पण आता त्यांना मिळत आहेत ६०+ जागा म्हणजे १०० जागांवर त्यांना हार मानावी लागली हे स्पष्ट आहे. मराठी माणूस जर एकवटला असेल तर या एवढ्या जागांवर त्यांना हार का मानावी लागली, याचे उत्तर मिळायला हवे. त्या तुलनेत भाजपाने १३७ जागा लढवून निदान जे निकाल रात्रीपर्यंत हाती आले त्यानुसार जवळपास ९० जागा जिंकल्या होत्या. म्हणजे भाजपाचा स्ट्राइक रेट चांगला होता आणि त्याच मुंबईत मराठी माणसाने त्यांनाही साथ दिली हे स्पष्ट होत होते. २०१७च्या निवडणुकीतही भाजपाला ८२ जागा होत्या. पण त्या निवडणुकीत ८४ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला यावेळी उबाठाच्या रूपात ६० जागाच हाती लागल्या.
महत्त्वाचे म्हणजे उबाठा गटाला लोकसभा निवडणुकीत ज्या मुस्लिम मतदारांनी मदतीचा हात दिला, त्यांनी यावेळी त्यांना साथ दिली नाही. ती मते एमआयएम आणि काँग्रेस यांना मिळाली. त्यातून एमआयएमचे ८ तर काँग्रेसचे २२ उमेदवार जिंकून आले. मुस्लिम मतदार हे ‘विचारपूर्वक’ मतदान करतात, ते प्रेमात पडत नाहीत, हे उबाठाला या निवडणुकांच्या निमित्ताने समजले असेल. एकूणच केवळ मराठीबहुल मतदार असलेल्या ठिकाणीच ठाकरे बंधूंचे अस्तित्व शिल्लक राहिले. एकेकाळी महाराष्ट्रात अनेक महानगरपालिका काबीज करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता काही मोजक्या विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादित केले ते याच मराठी माणसाने. एकूणच ठाकरे ब्रँडचा करिश्मा हा महाराष्ट्रात नाहीच पण मुंबईतही सगळीकडे नाही याची ग्वाही देणारी ही निवडणूक ठरली. मग ठाकरे बंधूंना मुंबईतील मराठी माणसाकडून जो अपेक्षित प्रतिसाद हवा होता, तो का मिळाला नाही. काय कारणे होती त्याची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशमध्ये हिंदू शिक्षकाचे घर जाळले
टी२० विश्वचषकापूर्वी नेपाळचा मोठा डाव
खरे तर गेल्या सहा सात महिन्यांपासून मुंबईत हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा खूप चर्चिला गेला. महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे बरेच भांडवल केले गेले. तेव्हापासून हे दोन बंधू या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत होते. त्यातूनच हे दोन बंधू एकत्र येणार, एकत्र निवडणूक लढवणार याची चर्चा झाली. प्रत्यक्षात त्या सहा सात महिन्यात त्यांची ही राजकीय युती झाली नाही. निवडणुकीच्या तोंडावर शेवटी ती युती झाली. मात्र मुळात ही युती होण्यासाठी २० वर्षे का वाट पाहावी लागली असा सर्वसामान्य मराठी माणसाचा प्रश्न होता. त्याचे उत्तर ठाकरे बंधूंनी दिले नाही. ते एकत्र येण्यामागे भावनिक कारण जरी दिले जात होते तरी मुंबई महानगरपालिका हातून निसटू नये हाच त्यामागे उद्देश होता हे स्पष्ट होते. त्यासाठी ठाकरे बंधू सणसुदीला एकमेकांच्या घरी जाण्याचे प्रसंग, कोणत्या तरी कार्यक्रमाला, लग्नसमारंभाला एकत्र येण्याचे प्रसंग हे वारंवार दाखवून दोघेही बंधू एकत्र येण्यातच मराठी माणसाचे प्रारब्ध आहे, असे चित्र उभे केले गेले. पण मराठी माणूस हा केवळ ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून मतदान करणारा नाही, हेच या निकालातून स्पष्ट झाले. बरे यातून एक प्रश्न निर्माण होतो की, मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी इतक्या वर्षात मराठी माणसाला नेमके काय दिले? अचानक २० वर्षांनी हे मराठी माणसावरील प्रेम कसे काय जागृत झाले हादेखील प्रश्न होता. त्यामुळे केवळ मुंबई महानगरपालिकेतील २५ वर्षांची सत्ता हातून निसटण्याची शक्यता लक्षात घेऊनच हे बंधू एकत्र आले हेच खरे होते.
पण एवढे करूनही मग बहुमताचा आकडा त्यांना का गाठता आला नाही तर त्यामागे मराठी माणसाने दाखवलेली जागरुकता होती. शिवाय, ठाकरे बंधूंनी या सहा सात महिन्यात केवळ काही मराठी मीडियाला हाताशी धरून केलेले राजकारणही कारणीभूत होते. पत्रकार परिषदा घेऊन कधी निवडणूक आयोग, कधी न्यायालये, कधी केंद्र आणि राज्यातील सरकारे याविरोधात रडारड करणे हा एकमेव कार्यक्रम होता. त्यातून निवडणुका जिंकता येतील, असा भ्रम कदाचित ठाकरे बंधूंना झाला होता. मतदानाच्या वेळी बोटावरील शाई पुसली जाते यावरून नको तेवढा गदारोळ करण्यात आला. अशा या घटनांना अवास्तव महत्त्व देत निवडणूक आयोग हे सॉफ्ट टार्गेट बनविण्याचा उद्योग सातत्याने ठाकरे बंधूंनी केला. महाराष्ट्रातून ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर त्याबाबत राज ठाकरेंचे नेते अविनाश जाधव कोर्टात गेले. तिथे कोर्टाने त्यांना चपराक लगावली आणि दंडही ठोठावला. तामिळनाडूचे भाजपा नेते अण्णामलाई मुंबईत आले तेव्हा त्यांची खिल्ली राज ठाकरेंनी उडविली. यातून मराठी-अमराठी असे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण अण्णामलाई ज्या भागात प्रचारासाठी गेले तिथे भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळविला. मराठी माणसाने त्या नरेटिव्हलाही केराची टोपली दाखवली. अगदी ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यावर काही मीडिया हाऊसेसमध्ये जल्लोष केल्याचे व्हीडिओदेखील समोर आले होते. यातून स्पष्ट दिसत होते की, वातावरणनिर्मिती करून आपली प्रतिमा उंचावणे हेच काम ठाकरे बंधूंनी केले.
आताही निकालानंतर ज्या भागात ठाकरेंना यश मिळाले त्याचा गवगवा करून मीडियाने जणू काही मुंबईत ठाकरेंनाच बहुमत आहे, असे एक चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे हे मराठी माणसाच्या बाजूने आहेत, तर भाजपा शिवसेना महायुती ही विरोधात आहे हे वातावरण तयार करण्याचाही प्रयत्न झाला. पण त्याचे परिणाम काही दिसले नाहीत. उलट भाजपालाही मराठी माणसाने भरभरून मते दिली. मुंबईतच कशाला. २९ पैकी २५ महानगरपालिकांत भाजपाचीच सरशी झाली. मराठी माणसानेच भाजपाला हा विजय मिळवून दिला. त्यामुळे मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून फक्त मुंबई महानगरपालिका जिंकणे हा एकमेव उद्देश होता, हे पुरेसे स्पष्ट होते. पण आता मुंबई महानगरपालिकेवरची ठाकरेंची सत्ता २५ वर्षानंतर संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोणतीही महानगरपालिका त्यांच्या हाती नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र काही मनपामध्ये भाजपासोबत जात तिथे सत्तेत राहण्यात यश मिळविले आहे. मुंबईतही तेच सत्तेत राहतील.
२०१९मध्ये भाजपासह बहुमत प्राप्त झालेले असतानाही उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षांसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळविले त्याची एकप्रकारे परतफेड याच मराठी जनतेने केली असे या निकालावरून म्हणता येईल. मराठी माणसाने तेव्हाही भाजपा शिवसेना युतीला भरभरून मते दिली होती. पण त्याचा एकप्रकारे अपमान करून ठाकरेंनी वेगळी चूल मांडली आणि भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी मराठी माणसाच्या मतांची अवहेलना केली, त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसला असेही म्हणता येईल.
बरे यातून राज ठाकरेंचा कोणता फायदा झाला. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने ८ ते ९ जागा जिंकल्या असे दिसून आले. पण त्यांच्या या जागा आणि उबाठाच्या जागा यांची बेरीज ७० पर्यंतच पोहोचते. जी ठाकरेंच्या शिवसेनेने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांपेक्षा कमी आहे. निवडणुकीआधी संजय राऊत, महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचाही फज्जा उडाल्याचे सगळ्यांनी पाहिले. मराठी माणसासाठी आपण काय करणार आहोत, यापेक्षा महाराष्ट्रातील सरकार, भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यावर जहरी टीका करण्यापलिकडे त्यातून काहीही हाती लागले नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून ठाकरे बंधूंनी या निवडणुकीत काम केल्याचे चित्र अगदीच विरळा होते. महाराष्ट्रातील पालिका निवडणुंकाकडे त्यांचे लक्षच नव्हते. फक्त एकच लक्ष्य होते ते मुंबई महानगरपालिका. मग महाराष्ट्रातील मराठी माणसाची काळजी त्यांना का वाटली नाही, हा प्रश्नही उपस्थित होतो. मराठी माणसाचा उत्कर्ष करायचा तर तो फक्त मुंबईतील मराठी माणसाचाच करायचा का, हा प्रश्नही होता. प्रचारातही ठाकरे बंधू मागे पडलेले दिसले. मुंबईतही त्यांनी शिवाजी पार्कची सभा सोडली तर सभा घेतल्या नाहीत. शाखा शाखांना भेटी दिल्या एवढेच. त्यामुळे ज्यांनी खरी मेहनत घेतली त्यांच्यावर मराठी माणसाने विश्वास दाखविला.
भाजप-शिवसेना युतीचा हा विजय सर्वसमावेशक विजय आहे. त्यात मराठी माणसाने तर साथ दिलीच पण दलित, जैन, गुजराती, उत्तर भारतीय अशा सर्व समाजातील लोकांनी महायुतीला साथ दिली. एका वर्गाचे राजकारण करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे या निवडणुकांनी स्पष्ट केले आहे.
