जबलपूर दुर्घटना: बोट बुडायला लागल्यानंतर लाईफ-जॅकेटची शोधाधोध केली

बचावलेल्या पर्यटकांनी केले खुलासे

जबलपूर दुर्घटना: बोट बुडायला लागल्यानंतर लाईफ-जॅकेटची शोधाधोध केली

मध्य प्रदेशमध्ये बोट उलटून झालेल्या अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात असताना या अपघातानंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बर्गी धरणावरील बोट उलटण्याच्या दुर्घटनेतील वाचलेल्या प्रवाशांनी शुक्रवारी सांगितले की, हवामान खात्याने वादळाचा इशारा देऊनही ‘नर्मदा क्वीन’ला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती आणि बोटीत चढण्यापूर्वी कोणत्याही प्रवाशाला लाईफ-जॅकेट घालण्यास सांगितले नव्हते. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही बचाव पथके बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहेत.

मध्य प्रदेश पर्यटन विभागाद्वारे चालवली जाणारी आणि २००६ पासून सेवेत असलेली ९० प्रवासी क्षमता असलेली ‘नर्मदा क्वीन’ ही नौका अपघातग्रस्त झाली. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आलेल्या भीषण वादळात ४० हून अधिक पर्यटकांना घेऊन ही बोट जात होती. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, २९ तिकिटे जारी करण्यात आली होती, परंतु एका स्थानिक बचावकर्त्याने सांगितले की, दिवसाची ही शेवटची सफर असल्याने आणखी अनेकांना नौकाविहाराची परवानगी देण्यात आली.

आपल्या तीन कुटुंबीयांसह बोटीवर असलेले आणि अपघातातून बचावलेले राजेश सोनी म्हणाले की, हवामानाच्या इशाऱ्यांमुळे बोट चालवणे थांबवायला हवे होते. असे असूनही बोटीला चालवण्याची परवानगी देण्यात आली. ही एक मोठी चूक आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना सुखरूप वाचवण्यात आले.

जबलपूर हवामान कार्यालयानुसार, गुरुवारी मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग, भोपाळच्या शास्त्रज्ञ अभिलाषा श्रीवास्तव म्हणाल्या, “३० एप्रिलच्या सकाळच्या हवामान अंदाजानुसार, ताशी ४०-५० किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह वादळाचा इशारा सर्व जिल्हा हवामान कार्यालयांना पाठवण्यात आला होता.”

राजेश सोनी म्हणाले की, परिस्थिती अधिकच बिघडल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी लाईफ-जॅकेट शोधायला सुरुवात केली. “खालच्या मजल्यावर ठेवलेले जॅकेट्स मिळवण्यासाठी एकच धावपळ उडाली होती. काही प्रवाशांना ते घालता आले नाहीत. जे ते घालू शकले, ते बचाव होईपर्यंत जिवंत राहिले; बाकीचे बुडून मरण पावले,” असे ते म्हणाले.

संगीता कोरी, आणखी एक वाचलेली व्यक्ती, म्हणाली की बोटीत चढताना लाईफ जॅकेटचे वाटप करण्यात आले नव्हते. “बोट सुरू झाली तेव्हा एकाही प्रवाशाने लाईफ जॅकेट घातले नव्हते. ती फक्त बोटीत कुठेतरी ठेवली होती. जेव्हा पाणी भरू लागले, तेव्हा त्यांनी ती वाटण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे घबराट आणि झटापट झाली. काही क्षणांतच बोट उलटली,” असे ती म्हणाली.

हे ही वाचा:

जर्मनीतून ५,००० अमेरिकन सैनिकांना माघारी बोलावणार

४ वर्षीय चिमुरडीची अत्याचारानंतर हत्या; ६५ वर्षीय आरोपी अटकेत

भोंदू बाबा खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स

महाराष्ट्र म्हणजे शौर्य, भक्ती, सुधारणा, राष्ट्रनिर्मितीचा अद्वितीय संगम!

किनाऱ्यावरील स्थानिकांनी सांगितले की, बोट उलटण्याच्या १५ ते २० मिनिटे आधीपासून ते बोटीला मागे फिरण्यासाठी ओरडून सांगत होते, पण त्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. “अचानक बोट उलटली आणि सर्व लोक पाण्यात पडले. आमच्यापैकी काही जण बोटीच्या दिशेने पोहून गेले आणि आम्ही काही लोकांना वाचवले,” असे त्यांच्यापैकी एकाने सांगितले.

नऊ कुटुंबीयांसह बोटीत असलेले वकील रोशन आनंद वर्मा म्हणाले, “आम्ही बोटीत चढलो तेव्हा हवामान स्वच्छ होते. पण बोट धरणाच्या मध्यभागी पोहोचताच हवामान अचानक बदलले. सोसाट्याच्या वाऱ्याने प्रचंड लाटा उसळवल्या, ज्यांनी बोटीला तडाखे दिले आणि केबिनमध्येही पाणी शिरले. बोट नियंत्रणाबाहेर जाऊ लागताच, पायलट आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, ज्यामुळे गोंधळ उडाला.” दरम्यान, क्रूझ पायलट महेश पटेल यांनी हे नाकारले आणि सांगितले, “प्रवाशांनी लाईफ जॅकेट घेण्यासाठी एका ठिकाणी धाव घेतल्यानंतर काही सेकंदातच क्रूझ बुडाली. इतकेच नाही, तर या दुर्घटनेनंतर एका तासाने स्थानिकांनी माझीही सुटका केली.”

Exit mobile version