अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यावर प्रसिद्ध गुंतवणूकदार जिम रोजर्स यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “ट्रम्पला जगाचं काही कळत नाही आणि विशेषतः आशिया आणि भारतात काय घडतंय, याची त्याला कल्पनाही नाही!”
अमेरिकेने जाहीर केलेल्या ५०% टॅरिफपैकी २५% टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू झाले असून उर्वरित २५% टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होतील.
जगातील अग्रगण्य आर्थिक विश्लेषकांपैकी एक असलेले जिम रोजर्स यांनी आयएएनएसला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं की, भारत हा सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारा देश आहे आणि वॉशिंग्टनने अवास्तव टॅरिफ लावून दीर्घकालीन व्यापार व गुंतवणूक संबंध बिघडवण्यापेक्षा, भारताशी अधिकाधिक व्यापार वाढवायला हवा.
रोजर्स म्हणाले, “ट्रम्प सकाळी उठतात, टीव्ही बघतात आणि मग काय करायचं हे ठरवतात. त्यांना वास्तवात जगाची फारशी माहिती नाही आणि भारतात काय चाललंय, ते तर अजिबातच नाही!”
रोजर्स यांच्या मते, जर वॉशिंग्टन आणि नवी दिल्लीने योग्य प्रयत्न केले, तर २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.
ते पुढे म्हणाले, “मी आयुष्यात प्रथमच पाहतोय की दिल्लीतील लोक आता अर्थशास्त्र समजून घेत आहेत. त्यांना समृद्धी आणि यशाचं महत्त्व समजलं आहे. भारतासाठी हा एक उत्साहजनक आणि क्रांतिकारी बदल आहे.”
रोजर्स यांच्या मते, भारत एक उत्तम देश आणि प्रभावी अर्थव्यवस्था बनू शकतो. ते म्हणाले की भारत लवकरच जगातील सर्वोत्तम गुंतवणूक स्थळांपैकी एक ठरेल आणि भविष्यात चीनलाही मागे टाकू शकतो.
मुक्त व्यापार करारांबद्दल (FTA) बोलताना रोजर्स म्हणाले की, “अधिक मुक्त व्यापार ही भारतासह संपूर्ण जगासाठी फायदेशीर गोष्ट आहे.”
भारताने आत्तापर्यंत १३ देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. याशिवाय भारत सध्या अनेक महत्त्वाच्या देशांबरोबर नवीन FTA वर चर्चा करत आहे, ज्यात युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया (CECA), पेरू, श्रीलंका (ETCA) आणि ओमान यांचा समावेश आहे.
