अजित पवारांच्या त्या विमानात होती वरळीतील पिंकी माळी

अजित पवारांच्या त्या विमानात होती वरळीतील पिंकी माळी

महाराष्ट्राच्या राजकारणासह संपूर्ण राज्यासाठी बुधवारचा दिवस अत्यंत दुर्देवी ठरला. बारामती विमानतळाजवळ चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत विमानातील फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हीचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पिंकी माळी मुंबईतील वरळी बीडीडी चाळ, बावनचाळ परिसरातील रहिवासी शिवकुमार माळी यांची कन्या होत्या. गेल्या सुमारे सहा वर्षांपासून त्या विमानसेवेत कार्यरत होत्या. मागील एक वर्षापासून त्या व्हीएसआर या खासगी चार्टर्ड विमान कंपनीमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होत्या. याआधी त्यांनी सांताक्रूझ आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सेवा बजावली होती.

मूळच्या उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील असलेल्या माळी कुटुंबाच्या तीन पिढ्या मुंबईत वास्तव्यास आहेत. दोन वर्षांपूर्वी पिंकी यांचा विवाह झाला होता. सध्या त्या पतीसह ठाण्यात राहत होत्या. मात्र वरळीतील आई-वडिलांच्या घरी त्यांचे नेहमी येणे-जाणे होते.

“मॉडेलिंगची आवड होती… पण मी हट्ट केला” – वडिलांची हृदयद्रावक प्रतिक्रिया

अपघातानंतर माध्यमांशी बोलताना पिंकी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी भावूक शब्दांत आपली व्यथा मांडली.
“माझ्या मुलीला मॉडेलिंगची खूप आवड होती. पण मला वाटायचं तिने विमानसेवेत जावं, म्हणून मीच हट्ट केला. आज असं वाटतंय… का केलं? आमचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे सांगतात, “अपघाताच्या आधी तिने फोन करून सांगितलं होतं की आज अजित पवार यांच्या फ्लाईटमध्ये ड्युटी आहे. सकाळी बातम्या पाहिल्या आणि विमान अपघात झाल्याचं कळलं. काही वेळातच पिंकीचं नाव समोर आलं… आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली.”

अनुभवी फ्लाइट अटेंडंट, स्वप्नं उरात घेऊन उड्डाण

पिंकी माळी या अत्यंत जबाबदार, हसतमुख आणि कामात कुशल कर्मचारी म्हणून ओळखल्या जात होत्या. प्रवाशांची काळजी घेणं, सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणं हे त्या प्रामाणिकपणे करत होत्या. विमानसेवेबरोबरच मनात मॉडेलिंगची स्वप्नंही त्यांनी जपली होती, असं कुटुंबीय सांगतात.

बारामती विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वरळीतील फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांना सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे. एका सामान्य कुटुंबातून विमानसेवेपर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी वाटत होता. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version