भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज के. एल. राहुल सध्या विजय हजारे चषक स्पर्धेत आपल्या घरच्या कर्नाटक क्रिकेट संघाकडून खेळत आहे. मात्र या स्पर्धेत राहुलची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. सलग दोन सामन्यांत त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे.
३ जानेवारी रोजी त्रिपुराविरुद्ध खेळताना राहुलने केवळ ३५ धावा केल्या. त्यानंतर ६ जानेवारीला राजस्थानविरुद्ध तो अवघ्या २५ धावांवर बाद झाला. सलग दोन सामन्यांतील हे अपयश न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
राहुलची निवड न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात करण्यात आली असून तो यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत खेळणार आहे. संघात त्याचे स्थान निश्चित असताना, त्याच्या फलंदाजीतील ही घसरण चिंताजनक मानली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अखेरची एकदिवसीय मालिका भारताने राहुलच्या नेतृत्वाखाली खेळली होती. त्या मालिकेत भारताने २–१ असा विजय मिळवला होता. न्यूझीलंड मालिकेत शुभमन गिल पुन्हा संघात परतत असून, राहुलकडे मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे.
३३ वर्षीय राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण जून २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केले होते. आतापर्यंत खेळलेल्या ९१ एकदिवसीय सामन्यांच्या ८३ डावांत तो १८ वेळा नाबाद राहिला असून, ७ शतके आणि २० अर्धशतकांच्या जोरावर त्याने ३,२१८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४९.५० इतकी आहे.
अखेरच्या १० एकदिवसीय सामन्यांमध्ये राहुलच्या खात्यात दोन अर्धशतके जमा झाली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ५६ चेंडूंत ६०, तर दुसऱ्या सामन्यात ४३ चेंडूंत ६६ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
सलग अपयशानंतर आता विजय हजारे चषकातील पुढील सामन्यांत राहुल कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
