भारतीय नौदलाने सागरी सुरक्षा आणि देखरेख क्षमतांना अधिक बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सागरी देखरेख प्रणाली ‘ट्रायडेंट समुद्रा’ (Trident- Samudra maritime surveillance system) सादर केली आहे. ही प्रणाली नवी दिल्ली येथे आयोजित एआय समिट २०२६ दरम्यान प्रदर्शित करण्यात आली. नौदलाच्या मते ही तंत्रज्ञान प्रणाली भारतीय महासागर क्षेत्रातील सागरी हालचालींच्या निरीक्षणाला नवी दिशा देऊ शकते.
या प्रकल्पाची निर्मिती तांत्रिक भागीदारांच्या सहकार्याने करण्यात आली असून त्यामध्ये ब्लेर्ग्स इनोवेशन यांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते, देखरेख, सुरक्षा आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ‘ट्रायडेंट–समुद्रा’ ही एक प्रगत इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकॉनिसन्स (ISR) प्लॅटफॉर्म म्हणून तयार करण्यात आली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अल्गोरिदमचा वापर करण्यात आला असून त्याच्या मदतीने सागरी हालचालींची ओळख, ट्रॅकिंग आणि विश्लेषण रिअल-टाइममध्ये करता येते. ही प्रणाली व्यापारी जहाजांची ये-जा तसेच संशयास्पद लष्करी हालचालींचे विश्लेषण करून असामान्य पॅटर्न जलद ओळखू शकते.
या प्रणालीद्वारे विविध सेन्सर्स, उपग्रह आणि समुद्राच्या तळाशी बसवलेल्या उपकरणांमधून मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करून व्यापक ऑपरेशनल चित्र तयार केले जाते. त्यामुळे नौदल आणि तटरक्षक दल यांना सागरी परिस्थितीची अधिक अचूक माहिती मिळू शकते.
नौदलाच्या मते ही प्रणाली समुद्राखालील हालचालींवर नजर ठेवण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. अलीकडील काळात हिंद महासागर परिसरात पाणबुडी हालचालींमध्ये वाढ झाल्याने ही तंत्रज्ञान प्रणाली विशेष उपयुक्त ठरेल असे मानले जाते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परदेशी पाणबुड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी, विशेषतः बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार परिसरातील रणनीतिक सागरी भागात, ही प्रणाली मदत करेल. ही प्रणाली भारतीय नौदलाच्या आधुनिक युद्धनौकांशीही जोडता येऊ शकते. नौदलाच्या मते या प्रणालीचा स्वदेशी विकास आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी सुसंगत आहे, ज्यामुळे परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबित्व कमी होईल.
हे ही वाचा:
आखाती देशांवरील हल्ल्यांबाबत इराणची माफी
तेहरानमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्ष्य
डॉलरसमोर पुन्हा घसरण; रुपया १५ पैशांनी कमकुवत
घरगुती गॅस ६० रुपयांनी तर, व्यावसायिक सिलेंडर ११५ रुपयांनी महागला
ट्रायडेंट–समुद्रा प्रणालीला नौदलाच्या माहिती नेटवर्कशीही जोडण्यात आले आहे, ज्यामध्ये Information Management and Analysis Centre आणि सागरी संवाद उपग्रह GSAT-7 यांचा समावेश आहे. त्यामुळे विविध स्त्रोतांकडून मिळणारी माहिती एकत्रित करून एक मजबूत देखरेख व्यवस्था तयार करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते भविष्यात ही प्रणाली ड्रोन स्वार्म, मानवरहित पाण्याखालील वाहने आणि इतर असममित धोक्यांना तोंड देण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. मात्र एआय आधारित प्रणालींमध्ये सायबर सुरक्षा आव्हानेही असतात. त्यासाठी नौदलाने स्वदेशी एन्क्रिप्शन आणि प्रगत सुरक्षा प्रोटोकॉलचा वापर केला आहे. नौदलाच्या मते या प्रणालीमुळे भारताच्या सुमारे 7,500 किमी लांबीच्या सागरी किनारपट्टीसह विशेष आर्थिक क्षेत्राची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होईल.
